स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ‘अनबिलिव्हेबल सावरकर’ विषयावर आधारित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ‘अनबिलिव्हेबल सावरकर’ भगूर ते अंदमान या विषयावर आधारित योगेंद्र आर. पाटील यांचे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार, २४ फेब्रुवारी २०२३ या दिवशी सकाळी ११ वाजता या चित्रप्रदर्शानाचे उद्घाटन स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात असिलता सावरकर – राजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, जे.जे. उपयोजित कला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गजानन शेपाल, ललित कला केंद्राचे प्राचार्य राजेंद्र महाजन, पाचोरा येथील श्रेयस मेडिकल फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयंत पाटील आणि अंजली गवळी उपस्थित होत्या. हे प्रदर्शन सर्वांना २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात पाहता येईल.

( हेही वाचा : गड-किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी राज्यव्यापी मोर्चा! पूर्वतयारीसाठी २१ फेब्रुवारीला बैठक )

यावर प्रतिक्रिया देताना योगेंद्र आर. पाटील म्हणाले की, “माझे आयुष्य जगण्याचे नियमन बिघडल्यामुळे माझ्यात प्रचंड शारीरिक अस्वस्थता व मानसिक अस्थिरता आली. सगळीकडे जणू काळोखच आहे असे वाटू लागले, अशा सुन्न व भयानक वातावरणात वीर सावरकरांचे वाङ्‍‍मय माझ्या हाती लागले. यानंतर मी त्यांचे बरेच साहित्य वाचले. त्यावेळी माझ्या मनात विचार आला, मातृभूमीसाठी संपूर्ण समर्पण करून काळ्यापाण्याची शिक्षा भोगताना अंदमानच्या त्या भयानक काळकोठडीत वीर सावरकरांच्या मनात पुढील जीवनासंबंधी कोणते विचार आले असतील? सावरकरांच्या या अफाट ऊर्जेच्या रहस्याचे मला एवढे आकर्षण झाले की, मी त्यांच्या प्रेमापोटी अंदमानला जाऊन त्यांच्या कोठडीत नतमस्तक झालो व माझ्यासाठी सावरकर कोठडी महातीर्थ झाली आणि तिथेच मला सावरकर चित्रमालेच्या निर्मितीची प्रेरणा मिळाली, यानंतर ही सर्व चित्रे मी रेखाटली.” भगूर आणि मुंबईनंतर आता मला हेच चित्रप्रदर्शन अंदमान त्यानंतर लंडन येथे आयोजित करण्याची इच्छा चित्रकार योगेंद्र आर. पाटील यांनी व्यक्त केली आहे.

हे चित्रप्रदर्शन पाहून प्रमुख पाहुणे सुद्धा भारावून गेले. या चित्रप्रदर्शनाला सावरकरप्रेमींनी भेट देऊन या सगळ्या चित्रांमागील संकल्पनेचा अर्थ जाणून घ्यायला हवा, असे असिलता सावरकर- राजे यांनी सांगितले आणि त्यांनी योगेंद्र आर. पाटील यांना भविष्यात अंदमानमध्ये चित्रप्रदर्शन आयोजित करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. आयुष्यातील सर्वात कठीण काळात योगेंद्र पाटील यांनी वीर सावरकरांचे वाङ्‍‍मय वाचून एक नवी सुरूवात केली, त्याचप्रमाणे सर्व तरुणवर्गाने सुद्धा वीर सावरकरांचे विचार आत्मसात केले पाहिजे. असे सांगत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी सर्वांना ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक वाचण्याचे आवाहन केले.

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जे.जे. उपयोजित कला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गजानन शेपाल यांनी या प्रदर्शनाचे नाव अदम्य सावरकर असे असते तर अजून छान झाले असते, असे म्हणाले आणि अंजली गवळी यांनी सुद्धा हे चित्रप्रदर्शन पाहून पुढील वाटचालीसाठी योगेंद्र आर. पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here