टास्क फोर्समध्ये अन्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करा! संदीप देशपांडेंची मागणी 

टास्क फोर्समध्ये अर्थतज्ज्ञ, वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ अशा लोकांचा समावेश करणे आवश्यक आहे, अशी सूचना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली.

91

सर्वप्रथम आपण एवढ्या व्यस्त कार्यक्रमामध्ये सुद्धा वेळ देऊन उपकृत केले, त्याबद्दल आपले मनापासून आभार. गेल्या पंधरा महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्र हा टाळेबंदीमध्ये अडकला आहे. अर्थात काही दिवसांचा अपवाद वगळता. टाळेबंदीचा निर्णय किंवा निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय हा आपल्या सल्ल्यानुसार घेतला जातो, असे वारंवार सांगितले जाते. आपल्या किंवा टास्कफोर्समधील असलेल्या आपल्या कुठल्याही सहकाऱ्यांच्या क्षमते विषयी माझ्या मनात शंका नाही हे सर्वप्रथम स्पष्ट करतो. परंतु मला प्रामाणिकपणे असे वाटते की, टास्क फोर्समध्ये अजून काही व्यापक मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे. आपल्यासारखी तज्ज्ञ डॉक्टर मंडळी तर आहेतच, पण त्याबरोबर काही अर्थतज्ज्ञ, वैज्ञानिक, शिक्षणतज्ज्ञ अशा लोकांचा समावेश करणे आवश्यक आहे, अशी सूचना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांना केली.

वारंवार सर्व बंद करणे योग्य नाही!

सध्या फक्त कोरोना रोग, त्याचे उपचार व त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम, फक्त यावरच विचार होताना दिसतोय. पण या सगळ्याचा रोजच्या जगण्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार केला जात नाही आहे, असे माझे निरीक्षण आहे. आज लाखो लोकांचा रोजगार गेला आहे. अनेकांचे उद्योगधंदे बुडालेले आहेत, लोकांचे बँकांचे हफ्ते थकलेले आहेत, अर्थ चक्र ठप्प झालेले आहे. यावर उपाय काय, याचीही चर्चा आवश्यक आहे. असे अनेक मुद्दे समोर आले की, जीव महत्वाचा जीव वाचला, तर सर्व काही हा युक्तिवाद पुढे केला जातो. अगदी मान्य जीव महत्वाचाच आहे त्याबद्दल दुमत असण्याचं कारणच नाही पण या युक्तिवादाचा आधार घेऊन आपण काही गोष्टींचा अतिरेक करतो आहोत का? आज रेल्वे प्रवास किंव्हा रस्ते प्रवास किंवा विमान प्रवास करत असताना अपघात होतात काही मृत्यू ही होतात म्हणून आपण प्रवास करणे थांबवतो का? तर त्याच उत्तर नाही, असे आहे. उलट आपण यातले धोके ओळखून अपघात कसा टाळता येऊ शकेल याचा विचार करून प्रवास चालु ठेवतो. बंद करत नाही. दुसरे एक उदाहरण बघूया तंबाखुजन्य पदार्थ किंवा मद्यपान या शरीरास हानिकारक गोष्टी आहेत. हे सर्वश्रुत आहे, म्हणून सरकारने त्या कायमस्वरूपी बंद केल्या आहेत का? तर नाही. कारण त्यातून सरकारला मिळणारा महसूल प्रचंड आहे. त्यामुळे सरकारने मध्य मार्ग काढत या दोन्ही गोष्टींवर अनेक निर्बंध लादले आहेत. कर वाढवले आहेत. पण या गोष्टी पूर्णपणे बंद केलेल्या नाहीत. याच प्रमाणे आपल्याला हा विचार करणे आवश्यक आहे की आपल्या संख्येला नाही तर त्यामुळे होण्याऱ्या मृत्यूला घाबरले पाहिजे. कायमची किंंवा सततची टाळेबंदी हा त्यावर उपाय असू शकत नाही. हे हळूहळू दबक्या आवाजात जग मान्य करायला लागल आहे, टाळेबंदीचा उपयोग हा रोगप्रसार थांबवण्यासाठी नाही तर व्यवस्था उभी करण्यासाठी केला पाहिजे, असे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले.

(हेही वाचा : अफगाण मुस्लिम बनले शरणार्थी! भारतीय मुस्लिम होतायेत टीकेचे धनी!)

व्यवस्थापनातील तज्ज्ञांचा समावेश करा!

एकदा ही गोष्ट आपण मान्य केली की आपल्या विचारला नवीन दिशा मिळू शकेल. आपण जर ठरवले की आपल्याला कोरोनाचा धोका कमी करून सर्व चालू करायचे आहे, तर आपल्याला अनेक मार्ग मिळू शकतात. पण त्यासाठी विचारांमध्ये सकारात्मकता आणावी लागेल. उदाहरणार्थ समजा आपल्याला शाळा चालू करायच्या आहेत, एखाद्या वर्गात पन्नास मुले आहेत तर त्याचे दोन भाग करून आठवड्यातून दोन-दोन दिवस त्यांना शाळेत प्रवेश देता येईल का? असा विचार होऊ शकतो का? म्हणजे प्रत्येकाला किमान दोन ते तीन दिवस शाळेत जाता येईल. मी काही यातला तज्ज्ञ  नाही आणि कोणी डॉक्टरसुद्धा यातले तज्ज्ञ  नाहीत. हा विषय व्यवस्थापनाचा विषय आहे. म्हणूनच या टास्क फोर्समध्ये सर्व प्रकारची तज्ज्ञ  मंडळी असली पाहिजेत, असा माझा आग्रह आहे. कुठे रुग्ण संख्या वाढतेय, कशामुळे वाढतायेत, इतर अनेक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी डेटा परीक्षक पाहिजेत. ज्याला आपण म्हणतो की चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करण्यासाठी शास्त्रज्ञ पाहिजेत. आज जी मते आपल्यासमोर मांडली आहेत ती अनेक मते अनेक लोकांनी माझ्याशी चर्चा करताना मांडली आहेत. ती सर्व एकत्रित करून आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या डेल्टा प्लस तिसरी लाट याची जोरदार चर्चा चालू आहे. म्हणूनच लहान तोंडी मोठा घास घेतोय त्याबद्दल क्षमस्व. पण आता पुन्हा टाळेबंदी लोकांच्या सहनशक्तीचा अंत करणारी ठरेल म्हणून हे धाडस केले. आपण या सर्व मुद्द्यांचा सर्व दृष्टिकोनातून निश्चित विचार कराल, असा ठाम विश्वास आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.