बीकेसी कोविड सेंटरमध्ये रुग्णांची गैरसोय… भाजप नगरसेवकाचा आंदोलनाचा इशारा!

या सेंटरमध्ये रुग्णाला दाखल केल्यानंतर बराच कालावधी उलटल्यानंतरही उपचार केले जात नसल्याची बाबही आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत, नगरसेवकांनी तक्रारींचा पाढाच वाचला आहे.

मुंबईतील पहिले ओपन रुग्णालय म्हणून ज्याची ख्याती आहे, त्या बीकेसीतील महापालिका जंबो कोविड सेंटरमध्ये रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णांसाठी विभाग कार्यालयातील वॉररुम मधून बेड बूक केल्यानंतरही प्रत्यक्षात तिथे पोहोचल्यानंतर रुग्णाला बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे रुग्णाला चार-चार तास रुग्णवाहिकेतच बसून वाट पाहावी लागत आहे. रुग्णांकडून वारंवार येणाऱ्या या तक्रारींमुळे नगरसेवकही आक्रमक झाले असून, भाजपचे कुर्ला येथील नगरसेवक हरिष भांदिर्गे यांनी जर यापुढे अशाप्रकारे रुग्णांची हेळसांड होणार असेल, तर आपण बीकेसी कोविड सेंटरबाहेरच आमरण उपोषण करू, असा इशारा दिला आहे.

भांदिर्गेंनी वाचला तक्रारींचा पाढा

कुर्ला येथील भाजपचे नगरसेवक हरिष भांदिर्गे यांनी पाच दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना निवेदन देत, बीकेसीतील रुग्णांची नियोजनाअभावी होणाऱ्या गैरसोयीबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. भांदिर्गे यांनी या निवेदनात बीकेसी कोविड सेंटर येथे रुग्णांची योग्यप्रकारे व्यवस्था केली जात नसल्याच्या अनेक तक्रारी आपल्याला प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. यामध्ये त्यांनी या सेंटरमध्ये योग्यप्रकारे साफसफाई केली जात नाही, सेंटरचा वॉर रुमचा नंबर बंद असणे किंवा अनेकदा फोन केल्यास तो न उचलणे, अशा तक्रारी आहेत. चालू असणारे संपर्क क्रमांक रुग्णांच्या नातेवाईकांना देणे गरजेचे आहे, जेणेकरून रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होत नाही. उलट आपल्या रुग्णांची माहिती मिळत नसल्याने नातेवाईकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरणा पसरलेले असते. तसेच कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. डेरे हेही नगरसेवकांचे फोन घेत नसल्याचाही आरोप भांदिर्गे यांनी केला आाहे. या सेंटरमध्ये रुग्णाला दाखल केल्यानंतर बराच कालावधी उलटल्यानंतरही उपचार केले जात नसल्याची बाबही आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत, त्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला आहे.

(हेही वाचाः मुलुंडच्या जंबो कोविड सेंटरमध्ये ३५ आयसीयू बेड वाढणार!)

नाहीतर आमरण उपोषण करेन

या कोविड सेंटरमध्ये एल विभागाच्या वॉर रुममधून रुग्ण खाटा आरक्षित केल्या जातात. पण प्रत्यक्षात रुग्णवाहिकेतून रुग्णाला तिथे घेऊन गेल्यानंतर इथे बेड उपलब्ध नाही, दुसरीकडे जाऊ शकता, असे उत्तर दिले जाते. महापालिकेच्या विभाग कार्यालयातील वॉर रुममधून बेड आरक्षित करुन देखील जर संबंधित रुग्णाला बेड उपलब्ध होत नसेल, तर ते फारच दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच रुग्णवाहिका कोविड सेंटर येथे गेल्यावर किमान चार तास रुग्णांना दाखल करुन घेण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. त्यामुळे अशाप्रकारे रुग्णांची हेळसांड होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचेही त्यांनी या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे या कोविड सेंटरमधील समस्यांचे निवारण करुन योग्यप्रकारे रुग्णांना दाखल करुन घेण्याचे नियोजन करावे. अन्यथा आपण कोविड सेंटर समोर स्वत: कोविड नियमांचे पालन करत आमरण उपोषणाला बसणार आहे, असा इशारा भांदिर्गे यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.

अशी आहे कोविड सेंटरची अवस्था

काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराच्या पत्नीचे निधन बीकेसीतील कोविड सेंटरमध्ये झाले होते. त्याने आपल्या पत्नीशी व्हिडिओ कॉलवरुन बोलताना आपल्याला येथून दुसरीकडे न्या, असे सांगत तेथील आसपासच्या उलटी आणि जुलाब यामुळे पसरलेल्या अस्वच्छतेकडेही लक्ष वेधले होते. त्यामुळे एकीकडे आपल्याला कोणी तपासतही नाही, अशीही खंत तिने व्यक्त केली होती आणि शेवटी विव्हळतच तिने आपले प्राण सोडले. याबाबतचा अनुभव तिच्या पतीने मांडल्यानंतरही बीकेसीतील तक्रारींचा हा पाढा आता खुद्द नगरसेवकाने आपल्या विभागातील रुग्णांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे मांडला आहे. त्यामुळे आयुक्त आता यावर कार्यवाही करतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

(हेही वाचाः …आणि हिंदू महासभा रुग्णालयातील ६० जणांचे प्राण वाचले! महापालिका प्रशासनाच्या कामगिरीला सलाम)

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here