महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. कांदा, टोमॅटो, कडधान्ये, डाळी, गॅस सिलेंडर अशा जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता मैदाच्या किमती वाढल्यामुळे ब्रेडची किंमतही वाढली आहे.
ब्रेडच्या एका पाकिटामागे 2 ते 8 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मैद्याची किंमत वाढल्याने जमाखर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी ब्रेडची किंमत वाढवणे गरजेचे असल्याचे ब्रेड उत्पादक कंपन्यांनी म्हटले आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. धान्य आणि भाज्या महागल्यामुळे अनेकांनी ब्रेडला पसंती दिली होती, पण आता सफेद (स्लाईड व्हाईट ब्रेड)च्या किंमतीत 2 ते 8 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ब्रिटानिया,विब्स आणि मॉडर्नसह सर्व प्रमुख ब्रेड उत्पादकांनी 8 सप्टेंबरपासून किमतीत वाढ केली आहे.
सँडविच विक्रेते वापरतात त्या 800 ग्रॅमच्या ब्रेडची किंमत 70 रुपयांवरून 75 रुपयांवर गेली आहे. 350-400 ग्रॅम वजनाच्या घरात नियमित खाल्ल्या जाणाऱ्या ब्रेडची किंमत आता 35 रुपयांवरून 38 रुपये झाली आहे. 18 रुपयांत मिळणारी 200 ग्रॅमच्या मिनी ब्रेडची किंमत 20 रुपये झाली आहे. मोठा ब्रेड म्हणजे जो 600 ते 650 ग्रॅम पाकिटातील ब्रेडची किंमत 60 रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. मैद्याची किंमती वाढल्याने व्हाईट ब्रेडच्या किमतीत वाढ करण्यात आली असली, तरी ब्राऊन ब्रेडच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.
अंधेरीतील क्वालिटी कन्फेक्शनर्स अँड बेकर्सचे संचालक सलाहुद्दीन खान यांनी सांगितले की, मैद्याच्या 50 किलोच्या पिशवीची किंमत 1,500 ते 1,700 रुपये आहे. त्याच्या किमती 30 रुपये प्रतिकिलोहून 34 रुपये प्रति किलो झाल्या आहेत. आमच्या कच्च्या मालात 80 टक्के मैद्याचा वापर होत असल्याने जमाखर्चाचा ताळमेळ साधण्यासाठी दरवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. मैद्यासह कच्च्या मालाच्या किमतीतही वाढ झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community