मुंबई महापालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये काम करणाऱ्या आरोग्य सेविकांच्या मानधनाचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असून आजवर ५ हजार मानधन देण्यात येणाऱ्या आरोग्य सेविकांना चार हजारांची मोठी वाढ देत ९ हजार एवढी वाढ केली असली तरीही त्यांचे मानधनवाढीसाठी आजही आंदोलन सुरु आहे. त्यामुळे या जून महिन्यापासून दोन हजार रुपये पूर्वलक्षी प्रभावाने आणि पुढील वर्षी एप्रिल महिन्यापासून एक हजार रुपयांची वाढ करून या आरोग्य सेविकांचे मानधन दरमहा १२ हजार रुपये एवढे करण्याचा विचार सुरु आहे. प्रशासनाच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या माध्यमातून याबाबतचा प्रस्ताव तयार केला जात आहे. त्यामुळे या प्रस्तावाला आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्षात आरोग्य सेविकांना वाढीव मानधनाचा लाभ खात्यात जमा होणार आहे.
( हेही वाचा : तुम्हाला पोहायचे आहे, तर जलतरण तलावांमध्ये सदस्यत्वसाठी करा ऑनलाईन नोंदणी)
आरोग्य सेविकांचे मानधन वाढले
मुंबई महापालिकेच्या १८३ आरोग्य केंद्रांमध्ये ३७०० महिला आरोग्य स्वयंसेविकांची हंगामी पदे असून या आरोग्य सेविकांना पूर्वी ५ हजार एवढे मानधन यापूर्वी देण्यात येत होते. परंतु १ सप्टेंबर २०१९पासून या आरोग्य सेविकांना ४ हजार रुपयांची वाढ देऊन त्यांचे मानधन दरमहा ९ हजार एवढे केले होते. परंतु त्यानंतर त्यांच्या मानधनामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ आलेली नव्हती. परंतु यापुढे या आरोग्य सेविकांच्या मानधनात कोणतीही वाढ करण्यात येणार नाही,असे स्थायी समितीमध्ये २९ ऑक्टोबर २०२०मध्ये मंजूर केलेल्या प्रस्तावामध्ये नमुद केले होते.
पुढील वर्षांपासून १२ हजार रुपये एवढे दरमहा मानधन दिले जाणार
त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य सेविकांनी मागील मार्च महिन्यांमध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले होते. त्यानंतर कामगार संघटनेबरोबर चर्चा झाल्यानंतर तत्कालिन महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने बनवलेल्या अहवालानुसार जून २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यं दोन हजार एवढे वाढवून दरमहा ११ हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. तर १ एप्रिल २०२३ पासून या मानधनात आणखी १ हजार रुपये वाढ करून दरमहा १२ हजार रुपये मानधन देण्याचा विचार प्रशासनाने केला असून याबाबतचा प्रस्ताव आरोग्य विभागाच्या माध्यमातून तयार करण्याचे काम सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
या बाबतच्या प्रस्तावाला आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांची परवानगी मिळाल्यानंतर आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतर आरोग्य सेविकांना जून २०२२ पासून ११ हजार रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे, तर पुढील वर्षांपासून १२ हजार रुपये एवढे दरमहा मानधन दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community