मुंबईतील स्मशानभूमींची स्वच्छता राखण्यासाठी यापूर्वी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराचा दोन वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतरही, केवळ कोरोनाचे नाव पुढे करत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या कंत्राटदारांना आणखी नऊ महिन्यांकरता मुदत वाढवून दिली आहे. ९ महिन्यांकरता प्रशासन ४ कोटी ८७ लाख ७६ हजार रुपये मोजणार आहे. नऊ महिन्यांचा हा वाढीव कालावधी ३० जून २०२१ रोजी संपुष्टात येत असताना आता प्रशासनाने हा प्रस्ताव आणला असून, प्रत्यक्षात निविदा मागवण्याची कार्यवाही न करता पुन्हा एकदा वाढीव काम निविदा न मागवता याच कंपनीच्या घशात घालण्याचा डाव प्रशासनातील अधिकाऱ्यांचा असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
दोन वर्षांसाठी १३ कोटींचे कंत्राट
मुंबई महापालिकेच्यावतीने यापूर्वी शालेय इमारतींची व आसपासच्या परिसरांची स्वच्छता व देखभाल करण्यासाठी क्रिस्टल, बिव्हीजी या कंपन्यांना तीन वर्षांच्या कंत्राट कामांच्या तुलनेत दुप्पट कालावधी हा मुदतवाढ देत वाढवून देण्यात आला. त्यानंतर रस्त्यांवरील चर बुझवण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांनाही पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. अशाप्रकारे मर्जीतील कंत्राटदारांना प्रशासनातील अधिकारी कोविडच्या नावाखाली मुदतवाढ देत त्यांना अप्रत्यक्ष मदत करत आहेत. असे असतानाच आता स्मशानभूमीतील स्वच्छता आणि देखभालीच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या केएचएफएम हॉस्पिटॅलिटी व फॅसिलीटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ऑक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०२०पर्यंत दोन वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राट देण्यात आले होते. या दोन वर्षांच्या कालावधीसाठी १३ कोटी ७० हजारांचे कंत्राट देण्यात आले. परंतु कोविडचे कारण देत याच कंपनीला आणखी सहा महिन्यांचे कंत्राट वाढवून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
(हेही वाचाः लसीकरणासाठी बाहेरील व्यक्ती मुंबईत… नगरसेवक झाले स्थानिकांच्या रोषाचे धनी)
कालावधी संपूनही निविदा नाही
मुंबई महापालिकेच्यावतीने ऑक्टोबर २०२० ते सप्टेंबर २०२३ पर्यंतच्या स्वच्छतेच्या कंत्राटासाठी जुलै २०२० रोजी मंजुरीही प्रशासनाने दिली. त्यासाठी जुलै २०२० पासून निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु मे २०२१ उजाडत आले तरी या निविदेची प्रक्रिया सुरुच आहे. सद्यस्थितीत कोविड-१९ची महामारी अद्यापही सुरू असून, त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे आणि मृत्यूचे प्रमाणही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोविडची ही चिंताजनक परिस्थिती पाहता स्मशानभूमीतील स्वच्छतेची कामे सुरळीत पार पाडता यावीत, याकरता ९ महिन्यांचा कालावधी वाढवून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी ४ कोटी ८७ लाख रुपयांचे वाढीव कंत्राट याच संस्थेला देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या संस्थेला मुदतवाढ देता यावी, याकरता प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ९ महिने उलटत आले तरी याची निविदा अंतिम केलेली नाही.
(हेही वाचाः कामा रुग्णालयात कोविडच्या आणखी 100 खाटा वाढवणार!)