लोकलमध्ये वाढली गर्दी! कोरोनाच्या संसर्गाचीही भीती! 

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाला परवानगी दिल्यानंतर सोमवारी, १६ ऑगस्ट हा पहिला कार्यालयीन दिवस उजाडला, तेव्हा लोकलमध्ये गर्दी वाढलेली दिसून आली.

65

मुंबईसह राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ ऑगस्टपासून राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांमध्ये शिथिलता आणली. त्याप्रमाणे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेणाऱ्यांसाठी लोकल प्रवासाला परवानगी दिली आहे. सोमवारी, १६ ऑगस्ट हा पहिला कार्यालयीन दिवस उजाडला तेव्हा लोकलमध्ये गर्दी वाढलेली दिसून आली. अशा वेळी पुन्हा कोरोना संसर्ग वाढू नये याकरता नागरिकांनी नियमांचे पालन काटेकोरपणे करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

रेल्वेने लोकल फेऱ्या वाढवल्या!

जेव्हापासून राज्य सरकारने कोरोनाच्या लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाला परवानगी दिली, त्यानंतर अवघ्या ५ दिवसांत मध्य रेल्वेच्या ७९ हजार प्रवाशांनी तर पश्चिम रेल्वेच्या ४१ हजार प्रवाशांनी लोकलप्रवासाचा रेल्वे पास काढला आहे. त्यामुळे साहजिकच त्यानंतर १६ ऑगस्ट या पहिल्या कार्यालयीन दिवसात लोकल गाड्यांमध्ये प्रवासी संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. प्रवाशांची संख्या वाढणार आहे, हे गृहीत धरूनच १६ ऑगस्टपासून मध्य रेल्वेने १ हजार ६८३ आणि पश्चिम रेल्वेने १ हजार ३०० लोकलच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

(हेही वाचा : तालिबानची दहशत: अमेरिकन म्हणतायेत ‘कम बॅक डोनाल्ड ट्रम्प’!)

आजपासून निर्बंध शिथिल

सोमवारपासून राज्यात अनेक ठिकाणी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. खासकरून राज्यभरातील मॉल, शॉपिंग सेंटरमधील दुकाने रात्री दहावाजेपर्यंत उघडे राहतील. मात्र, मॉल, शॉपिंग सेंटरमध्ये येणाऱ्या ग्राहकांना, दुकान मालकांना, या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीचे दोन डोस पूर्ण असतील तरच प्रवेश मिळणार आहे. यासोबतच खासगी कार्यालये, लोकल ट्रेन यासाठीही सूट देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.