परेलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील हिंदमाता उड्डाणपूल व परळ टी.टी. उड्डाणपूल यामधील रस्त्याची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामामुळे हिंदमाता परिसरात पावसाच्या पाण्यामुळे होणारा वाहतुकीचा अडथळा दूर होणार आहे. वाहतुकीचा प्रश्न सुटला, पण ढोपरभर पाण्यातून जाणाऱ्याा लोकांचे काय, हा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे. या रस्त्यांचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण व उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडले असूनही, ठाकरे यांनीही याठिकाणी वाहतुकीला कोणताही अडथळा राहणार नसल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
वाहतुकीचा मार्ग मोकळा
दरवर्षी पावसाळ्यात एफ/दक्षिण विभागातील हिंदमाता परिसरात पावसाच्या पाण्यामुळे वाहतुकीस होणारा अडथळा दूर करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील हिंदमाता उड्डाण पूल व परेल उड्डाणपूल यादरम्यानच्या रस्त्याची उंची १.२ मीटरने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार याचे काम एप्रिलमध्ये सुरू करुन, अडीच महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात आले. या कामामुळे हिंदमाता परिसरात पावसाच्या पाण्यामुळे होणारा वाहतुकीचा अडथळा दूर होणार आहे. तसेच या कामामुळे अतिवृष्टी वेळी हिंदमाता परिसरातील रस्ते वाहतूक उन्नत केलेल्या मार्गिकेमुळे पूर्णपणे सुरळीत सुरू राहील.
(हेही वाचाः रुग्णालयांना सीईओंची गरज: वरिष्ठ डॉक्टरांना प्रशासकीय कामांतून हवी मुक्तता)
असा आहे रस्ता
या रस्त्याची लांबी १८० मीटर, रुंदी १७ मीटर (सरासरी) असून दोन्ही पुलांमधील वाढवलेल्या रस्त्याची उंची १.२ मीटर आहे. रस्त्याचे आयुष्य वाढवण्यासाठी हा संपूर्ण रस्ता सिमेंट कॉंक्रिटचा करण्यात आला आहे. कमीत-कमी वेळेत या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. एचआयएलटीआय या तंत्रज्ञानाचा वापर करुन या रस्त्याची संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. तसेच रस्त्यावरील पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने ३०० मीटर व्यासाची पर्जन्य जलवाहिनी बसवण्यात आली आहे. या रस्त्यावर भविष्यात होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक अडथळे बसवण्यात आले आहेत. वाहने घसरुन अपघात होऊ नये, यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. तसेच आवाज प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात आली आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
या रस्त्याच्या लोकार्पण प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी पाणी भरत असल्यामुळे वाहतूक ठप्प होत होती. आता रस्त्याची उंची वाढवण्यात आल्यामुळे वाहतुकीला कुठल्याही प्रकारे अडथळा निर्माण होणार नाही. त्यासोबतच येथील भूमिगत टाक्यांचे काम सुद्धा वेगात पूर्ण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
(हेही वाचाः आदित्य ठाकरेंनी सांगितल्यावरच आयुक्त ‘ती’ झाडं उचलणार का?)
या प्रसंगी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर,अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी.वेलरासू, ‘एफ /उत्तर’ व ‘एफ /दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्ष रामदास कांबळे, माजी महापौर तथा नगरसेविका श्रद्धा जाधव, स्थानिक नगरसेविका उर्मिला पांचाळ, नगरसेवक अमेय घोले ,उपायुक्त विजय बालमवार, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) आर. पी. तळकर आदी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community