मध्य रेल्वेच्या एसी लोकल प्रवाशांनी ओलांडला १ कोटींचा टप्पा

मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण, बदलापूर, टिटवाळा दरम्यानच्या उपनगरीय विभागात ५६ वातानुकूलित सेवा चालवल्या जात असून २ जानेवारी २०२३ रोजी एका दिवसात वातानुकूलित लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी १ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. विशेष म्हणजे एप्रिल ते डिसेंबर २०२२ या कालावधीत एसी लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आकडाही १ कोटी पार झाला आहे.
 रेल्वे मंत्रालयाने मे २०२२ पासून दैनंदिन तिकिटांचे भाडे ५० टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये, रेल्वेने प्रथम श्रेणीच्या त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक सिझन तिकीट धारकांना त्यांच्या सिझन तिकीटामध्ये शिल्लक राहिलेले दिवस विचारात न घेता प्रथम श्रेणीच्या व वातानुकूलित सिझन तिकीटाच्या दरातील तफावतीतील रक्कम अदा करून  संपूर्ण कालावधीसाठी वातानुकूलित उपनगरीय ट्रेनमध्ये प्रवास करण्याची सुविधा दिली आहे.
मात्र, वातानुकूलित लोकलला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासन करत असले तरीही या लोकलमधून ५० ते ७५ टक्के प्रवासी हे फर्स्ट क्लास आणि जनरल तिकीट अथवा मासिक पासधारक असल्याने एसी लोकल गर्दीने भरलेल्या दिसत आहेत. प्रत्यक्षात एसी लोकल प्रवाशांचा आकडा वाढत असला तरीही या लोकलमध्ये तिकीट तपासनीस नियमित तपासणी करण्यास येत नसल्याने याचा फायदा घेऊन जनरल आणि फर्स्ट क्लास पासधारक या एसी लोकलमधून बिनदिक्कत प्रवास करत असल्याने, होणाऱ्या गर्दीमुळे एसी पासधारक प्रवाशांना लोकलमध्ये जागाही मिळत नाही.

मध्य रेल्वेच्या वातानुकूलित प्रवाशांची वाढलेली संख्या

  •  एप्रिल २०२२ – ५,९२,८३६
  • मे २०२२ – ८,३६,७००
  • जून २०२२ – ११,०३,९६९
  • जुलै २०२२ – १०,७९,०५०
  • ऑगस्ट २०२२ – १२,३७,५७९
  • सप्टेंबर २०२२ – १३,८२,८०६
  • ऑक्टोबर २०२२ – १२,७४,४०९
  •  नोव्हेंबर २०२२ – १२,५३,८९६
  • डिसेंबर २०२२ – १२,३९,४१९

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here