अरे देवा…आता डॉक्टर गेले संपावर

70

मुंबईत गुरूवारी कोरोनाचे ३ हजार ६१० रुग्ण आढळून आले होते. मागील दोन ते तीन दिवसांमध्ये १०० ते  १५० टक्क्यांनी रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे पहायला मिळत आहे. याच दरम्यान राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून (शुक्रवार) बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्यातील निवासी डॉक्टरांनी उद्यापासून राज्यातील सरकारी रुग्णालये आणि महाविद्यालयामधील ओपीडी, नॉन इमर्जन्सी वॉर्ड आणि निवडक सेवा न देण्याचा इशारा दिला आहे. आधीच राज्यात राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर आहेत, त्यातच आता डॉक्टरही संपावर गेले आहेत.

डॉक्टरांचे निवेदन

पद्व्युत्तरच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे ‘नीट’चे समुपदेशन रखडल्यामुळे हे विद्यार्थी रुजू झालेले नाहीत. त्यामुळे निवासी डॉक्टरांवरील कामाचा ताण वाढला आहे. आम्ही (निवासी डॉक्टर) आता किमान सात महिन्यांपासून दोन-तृतीयांश ताकदीने जास्त काम करत आहोत आणि यामुळेच आता आम्हाला शारीरिक आणि मानसिक दोन्ही त्रास होत आहेत. काही आठवड्यांपासून, बरेच जण प्रथम वर्षाच्या पद्व्युत्तर प्रवेशाची मागणी करत आहेत, परंतु केंद्र सरकारच्या अनेक अधिकाऱ्यांनी आश्वासन देऊनही, प्रवेशाची कोणतीही कालमर्यादा अद्याप जाहीर केलेली नाही. असे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टरांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा : सावधान! कोरोना वाढतोय… केंद्राकडून ‘या’ 8 राज्यांना विशेष निर्देश! )

नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भात निर्णय घ्यावा

केईएम, लोकमान्य टिळक आणि जेजे रुग्णालयातील डॉक्टर यात संपात सहभागी झाले असून, या रुग्णालयांमधील कोरोना रुग्णांच्या सेवा वगळता अन्य सर्व सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. NEET-PG 2021 परीक्षा, जी जानेवारीमध्ये व्हायला हवी होती, ती या वर्षी प्रथम फेब्रुवारी, नंतर एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. शेवटी या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रवेश परीक्षा घेण्यात आली, परंतु परीक्षेनंतरच्या प्रवेशांना EWS आणि OBC आरक्षण अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी, निवासी डॉक्टरांनी केली आहे.

यासोबतच डॉक्टरांनी पद्व्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ करावे, कोविड इन्सेन्टिव्ह आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उत्तम वसतिगृह सुविधा इत्यादी मागण्या केल्या आहेत. ऐन कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होताना मार्ड डॉक्टरांनी संप पुकारल्यामुळे उपचार घेणारे रुग्ण व सामान्य नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.