महाराष्ट्र मिलिटरी स्कूलमध्ये 77 वा स्वातंत्र्य दिन मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुरबाडमधील सामाजिक कार्यकर्ते, महाराष्ट्र राज्याचे कृषीभूषण पुरस्कारप्राप्त, शेतीनिष्ठ शेतकरी मा. बुधाजीराव बंगाल यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. सकाळी सव्वा नऊ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शाळेचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेची स्थापना आणि वर्धापन दिनाच्या निमित्ताने शाळेच्या वाटचालीविषयी माहिती देऊन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मार्गदर्शन केले. स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांच्या आणि क्रांतिकारकांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून प्राचार्य भोईर यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. समारंभात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भाषणे सादर केली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बुधाजीराव बंगाल म्हणाले की, ”इथे शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा केवळ शालेय शिक्षण घेणारा विद्यार्थी नसून देशभक्तीने ओतप्रोत भारलेला विद्यार्थी आहे. भारतीय सैनिक जसे देशासाठी सदैव लढतात, तसेच शेतकऱ्यांचे देशाच्या आर्थिक विकासात योगदान आहे. इथे शिकणारा प्रत्येक विद्यार्थी उद्याचा सैनिक आणि देशभक्त नागरिक असणार आहे.”
या कार्यक्रमाला सर्व शिक्षक, कर्मचारी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद देसले यांनी केले. राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
हेही पहा
Join Our WhatsApp Community