अमेरिका आणि फ्रान्स या देशानंतर आता भारत देखील अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात प्रगती पथावर आहे. येत्या २०३० पर्यंत भारत हा अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात जगातील तिसऱ्या स्थानावर पोहोचणार आहे. केंद्रीय अणुऊर्जा राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी म्हणजेच ९ एप्रिल रोजी याबद्दलची माहिती दिली. भारत येत्या २०३० पर्यंत अणुऊर्जा निर्मितीची २० गीगावॅट इतकी क्षमता साध्य करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. हा अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रातला मोठा टप्पा मनाला जात आहे.
( हेही वाचा : स्वच्छता मोहिमेनंतरही एसटी बसस्थानके अस्वच्छ का? दुरावस्थेची छायाचित्रे हिंदु जनजागृती समितीकडून महामंडळाला सादर )
केंद्रीय अणुऊर्जा राज्यमंत्री जितेंद्र सिंह पुढे म्हणाले की; २०२१ आणि २०२२ मध्ये अणुऊर्जा अणुभट्ट्यांनी ४७,११२ दशलक्ष युनिट वीज निर्माण केली, जी देशातील एकूण विजेच्या ३. ५% इतकी आहे. मुंबईतील भाभा अणुसंशोधन केंद्रामधील वरिष्ठ शास्त्रज्ञांसोबत चर्चा करून केंद्र सरकार भारतातील एकूण पाच राज्यांमध्ये १० अणुभट्ट्या निर्माण करणार आहे. कर्नाटक, हरियाणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये या १० अणुभट्ट्या उभारल्या जातील.
त्याचप्रमाणे केंद्र सरकारने फ्लीट मोडमध्ये प्रत्येकी ७०० मेगावॅट क्षमतेच्या १० स्वदेशी प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिऍक्टर्सना प्रशासकीय मान्यता आणि आर्थिक मंजुरी दिली आहे. सध्या अणुऊर्जा निर्मितीमध्ये भारत हा जगातील सहाव्या स्थानावर आहे. मात्र येत्या काही वर्षांत म्हणजेच २०३० पर्यंत भारत हा तिसऱ्या स्थानापर्यंत पोहोचताना आपल्याला दिसेल असे केंद्रीय अणुऊर्जा राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community