- ऋजुता लुकतुके
भारताच्या परकीय गंगाजळीत आठ आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पहिल्यांदा वाढ दिसून आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, परकीय गंगाजळीत १.५ अब्ज अमेरिकन डॉलरची वाढ झाली आहे आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत परकीय गंगाजळी ६५८ अब्ज अमेरिकन डॉलरवर स्थिरावली आहे. सप्टेंबरमध्ये भारताचा परकीय चलन साठा ७०४ अब्जांपर्यंत पोहोचला होता आणि हा सर्वकालीन उच्चांक होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि अमेरिकन डॉलरसमोर रुपयाची होत असलेली घसरण यामुळे हा साठा कमी होत चालला होता. (India Forex Reserves)
त्या घसरणीला अखेर नोव्हेंबरमध्ये थोडीफार खीळ बसली आहे. परकीय चलन मुबलक प्रमाणात असेल तर अर्थव्यवस्थेला जागतिक परिस्थितीची झळ कमी प्रमाणात बसते आणि अर्थव्यवस्थेला स्थिरता देण्याचं काम हा चलन साठा करत असतो. भारताकडे सध्या ६५८.८५२ अब्ज अमेरिकन डॉलर इतका परकीय चलन साठा आहे. शिवाय ६६.९७ अब्ज अमेरिकन डॉलर मूल्याचं सोनंही आहे. (India Forex Reserves)
(हेही वाचा – Ministry : मंत्रिपदाच्या अपेक्षेने मुंबई सुटेना)
परकीय चलनाचा साठा हा खासकरून आपल्याला आयातीसाठी उपयोगी पडतो आणि आताचा साठा पाहता एका वर्षाचा देशाचा आयातीचा खर्च यातून भागू शकतो. २०२२ मध्ये भारताची परकीय गंगाजळी ७१ अब्ज अमेरिकन डॉलरनी कमी झाली होती. उलट २०२३ मध्ये ती ५८ अब्जांनी वाढली. हे मूल्य अमेरिकन डॉलरमध्ये मोजलं जात असलं तरी परकीय गंगाजळी ही अमेरिकन डॉलर, युरो, जपानी येन अशा विविध चलनांमध्ये साठवली जाते. (India Forex Reserves)
आंतरराष्ट्रीय व्यापार तसंच देशातील चलनवाढ रोखण्यासाठी परकीय गंगाजळीचा उपयोग होत असतो. देशाची परकीय गंगाजळी सांभाळण्याचं काम मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक करत असते. रुपया घसरत असेल तर रिझर्व्ह बँक आपल्याकडचे डॉलर खर्च करून रुपयांत स्थिरता आणण्याचा प्रयत्न करते. उलट रुपया स्थिर असेल तर भविष्यातील उपयोगासाठी मध्यवर्ती बँक अमेरिकन डॉलर खरेदी करते. (India Forex Reserves)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community