भारतात कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार असल्याची शक्यता सतत वर्तवली जात आहे. त्यामुळे सरकारकडून जनतेला वारंवार कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन केले जात आहे. पण, इतर देशांच्या तुलनेत भारत मात्र कोरोनाची तिसरी लाट आतापर्यंत रोखण्यात यशस्वी ठरल्याने कदाचित भारतात तिसरी लाट येणारही नाही, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. देशात जवळजवळ ७५ कोटी जणांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे केवळ भौगोलिक विविधता आणि हवामान बदलांमुळे कोरोनाचे रुग्ण कमी अधिक प्रमाणात वाढू शकतात, पण आता भारताला कदाचित तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागणार नाही, असा दावा आयसीएमआरचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी केला आहे.
हिमाचल प्रदेश, गोवा, सिक्कीम, दादरा आणि नगर हवेली आणि दीव दमण , लडाख आणि लक्षद्वीप यांचा समावेश असलेली तीन राज्ये आणि समान केंद्रशासित प्रदेश यांनी त्यांच्या सर्व पात्र लोकसंख्येला कोविड – १९ लसीचा किमान एक डोस दिला आहे, असे सरकारने सांगितले. केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, मृतांच्या नातेवाईकांना भरपाई देण्यासाठी कोविड-१९ संबंधित मृत्यू ओळखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. केंद्राने म्हटले आहे की, ३ सप्टेंबर रोजी भारतीय रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयाने कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मृत्यूच्या कारणासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे.
(हेही वाचा : मुंबईच्या महाराजांची मूर्ती कशापासून साकारली? वाचा…)
७० लाख लोकांचे दररोज लसीकरण !
देशव्यापी लसीकरण मोहीम १ जानेवारी रोजी सुरू करण्यात आली आणि आरोग्य सेवकांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात आले. या मोठ्या प्रमाणात केलेल्या लसीकरणामुळेच भारत आतापर्यंत तिस-या लाटेला रोखू शकला आहे. दुसरीकडे मात्र युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, रशिया, ब्राझील आणि मेक्सिको हे देश कोरोनाच्या तिस-या लाटेचा सामना करत आहेत. आणखी अनेक राज्ये लवकरच १०० टक्के लसीकरणाची आकडेवारी गाठू शकतील, कारण भारतात सध्या सरासरी ७० लाख लोकांचे दररोज लसीकरण केले जात आहे.
Join Our WhatsApp Community