तब्बल सात वर्षांनी भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाली. २०१४ पर्यंत या मार्गावर नॅरोगेजवर चालणाऱ्या रेल्वेमुळे प्रवासाला बराच काळ लागत होता आणि कोळसा अधिक लागत होता. मात्र आता वेळेची बचत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांनी नुकताच नव्या रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला. जयनगर येथून निघालेली रेल्वे अवघ्या दोन तासांत जनकपूर येथे पोहचली. या रेल्वेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत झाले.
( हेही वाचा : बेस्ट अधिकाऱ्यांच्या मनमानीला लागणार चाप? )
भारत-नेपाळ रेल्वेसेवा
नॅरोगेजमुळे वेळ आणि कोळसा दोन्हींचा अपव्यय होत होता. त्यामुळे २०१४ मध्ये रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर दोन्ही देशांदरम्यान नव्याने झालेल्या ब्रॉडगेज रेल्वे मार्ग आणि अन्य सुविधांसाठी ८०० कोटी रुपयांचा खर्च आला.
ही गाडी जयनगर स्थानकातून सकाळी ८.१५ आणि दुपारी २.४५ वाजता सुटेल. ही रेल्वे दिवसभरात दोन फेऱ्या करेल. आता सुधारित सेवेत भारतातील जयनगरहून नेपाळमध्ये अगदी स्वस्तात प्रवास करता येणार आहे. जयनगर आणि कुर्था दरम्यान एकूण सात स्थानके आहेत. जयनगर ते इनरवा ४.५ किमीसाठी १२.५० रुपये, जयनगर ते खजुरी ८.६ किमीसाठी १५.६० रुपये, जयनगर ते महिनाथपूर १४.१५ किमीसाठी २१.८७ रुपये, जयनगर ते वैदेही १८.५३ किमीसाठी २८.२५ रुपये, जयनगर ते परवाहा २१.६ किमीसाठी ३४ रुपये, जयनगर ते कुर्था २९.५ किमीसाठी ५६.२५ रुपये भाडे मोजावे लागणार आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, पंतप्रधान देऊबा आणि आपण व्यापार पातळीवर सर्व प्रकारचे सीमापार संपर्क वाढविण्यावर भर देण्यावर सहमती दर्शविली आहे. जयनगर (भारत) आणि कुर्था (नेपाळ) दरम्यानची रेल्वे सेवा हा याचाच एक भाग आहे. उभय देशांतील लोकांचा प्रवास हा कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होण्यास अशा प्रकारच्या योजना मोलाची भूमिका बजावतील.
Join Our WhatsApp Community