सध्या भारतात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. रुग्ण संख्या कमी होण्यास तयार नाही. मागील तीन दिवसांपासून देशातील कोरोनाबाधित रुग्ण संख्या ४ लाखावर कायम आहे. गुरुवारी, ६ एप्रिल रोजी देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही ४ लाख १४ हजार नोंदवण्यात आली. तर मृत्यूचाही आलेख कमी होताना दिसत नाही. सध्या भारतात दर तासाला तब्बल १५० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
१० दिवसांत ३६,११० मृत्यू!
६ एप्रिल रोजी भारतात एकूण ३,९२७ जणांचा मृत्यू झाला. मागील १० दिवसांपासून मृत्यूची संख्या ३ हजाराच्या वर आहे. अशा प्रकारे या कालावधीत भारतात ३६,११० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेत १० दिवसांत ३४,६९२ मृत्यूंची नोंद झाली होती, तर ब्राझीलमध्ये ३२,६९२ जणांचा मृत्यू झाला होता. भारताने या दोन्ही देशांना मागे टाकले आहे. दरम्यान या देशांची आणि भारतातील लोकसंख्येची तुलना केली असता भारतातील स्थिती इतकी वाईट नसल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचा : होम क्वारंटाईन रुग्णांना घरपोच जेवणाचे डबे पोहचवणारा अन्नदाता!)
राज्यांची काय स्थिती?
गुरुवारी, ६ एप्रिल रोजी देशात ४ लाख १४ हजार ५५४ नवे रुग्ण आढळले. २४ तासांत १३ हून अधिक राज्यांनी १०० हून अधिक मृत्यू झाल्याची नोंद केली होती. महाराष्ट्र अद्यापही पहिल्या क्रमांकावर असून २४ तासांत ८५३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि कर्नाटकमध्ये ३०० हून अधिक तर छत्तीसगडमध्ये २०० हून अधिक मृत्यू झाले. दरम्यान १०० हून अधिक मृत्यू झालेल्या राज्यांमध्ये उत्तराखंडसोबत तामिळनाडू, हरियाणा, राजस्थान, पंजाब, झारखंड, गुजरात आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community