यंदाचा हिवाळा हाडे गोठवणार! काय आहे कारण?

प्रशांत महासागरात निर्माण होत असलेल्या निनामुळे भारत आणि दक्षिण आशियाला सर्वात थंड किंवा अत्यंत थंड हिवाळ्याला सामोरे जावे लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारताच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस पडल्याने तापमान घटले आहे. पण यंदा थंडीची चाहूल लागण्याआधीच नागरिकांची चिंता वाढवणारा अहवाल ग्लोबल वेदर एक्सपर्ट यांनी जाहीर केला आहे. अहवालानुसार, भारतात हाडे गोठवणारी थंडी पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा याआधी कधीही न पडलेल्या थंडीचा भारत साक्षी बनणार आहे. यामागचे कारण म्हणजे प्रशांत महासागरात निर्माण होत असलेला ‘ला निना’ हा घटक आहे, असे या अहवालात नमूद केले आहे.

या महिन्यात पडणार कडाक्याची थंडी

प्रशांत महासागरात निर्माण होत असलेल्या निनामुळे भारत आणि दक्षिण आशियाला सर्वात थंड किंवा अत्यंत थंड हिवाळ्याला सामोरे जावे लागणार आहे. आणि त्यामुळे आशियातील ऊर्जा संकटात भर पडण्याची शक्यता आहे. ला निना या हवामान प्रवाहामुळे उत्तर गोलार्धात अत्यंत थंडी पडणार आहे. तसेच भारताच्या काही भागांना या कडक थंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यांत भारतातील काही राज्यांमध्ये विशेषत: उत्तरेकडील राज्यांत प्रचंड थंडी पडण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांनी शासन निर्णय फेटाळला! संप चिघळला)

‘या’ देशाला करावा लागणार ऊर्जा संकटाचा सामना

ला निना इव्हेंट्स व्यतिरिक्त काही इतर घटकसुद्धा हाडे गोठवणा-या थंडीसाठी कारणीभूत ठरणार आहेत. हवामान बदलामुळे आर्क्टिकच्या कारा समुद्रात बर्फाचा अभाव आढळून आला आहे. त्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. असे अॅटमॉस्फेरिक G2 चे हवामानशास्त्र संचालक टॉड क्रॉफर्ड यांनी म्हटले आहे. यावर्षी  हाडे गोठवणारा  हिवाळा म्हणजे अनेक आशियाई राष्ट्रांमध्ये ऊर्जा संकट आहे, विशेषत: चीनला या ऊर्जा संकटाचा सामना करावा लागणार आहे. कारण, हा देश ऊर्जेचा सर्वात मोठा ग्राहक आहे. आशियातील इतर देशांप्रमाणे भारतालाही इंधनाच्या वाढत्या किमती आणि कोळशाच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे, असे या अहवालात नमुद करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here