इजिप्तने भारताकडून तीन दशलक्ष टन गहू आयात करण्याचे ठरवले आहे. एक कोटी टन गव्हाची निर्यात भारत अनेक देशांना करण्याच्या तयारीत असल्याचे, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. गव्हासाठी प्रामुख्याने रशिया आणि युक्रेनवर अवलंबून असलेल्या इजिप्तने युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतातून गहू आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारतीय गव्हाची मोठय़ा प्रमाणात निर्यात होणार आहे.
इजिप्तच्या मंत्र्यांशी चर्चा
याबाबत आपण नुकतीच इजिप्तच्या मंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांच्या शिष्टमंडळाने भारतात येऊन गव्हाच्या शेतांना व प्रयोग शाळांना भेटी दिल्या तसेच अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. त्यानंतर त्यांनी नुकताच हा निर्णय घेतला आहे. आता आपले शिष्टमंडळ इजिप्तमध्ये जाऊन चर्चा करेल व एक दोन मोठ्या व्यापाऱ्यांचा गव्हाचा साठा आधी तेथे पाठवून आम्ही सुरुवात करू, असे गोयल म्हणाले.
( हेही वाचा :राज्यात एक किलोमीटर रस्त्यावर सरासरी 128 वाहने…वाहनकराचे कोट्यावधी रुपये गेले तरी कुठे ? )
१० दशलक्ष टन गहू निर्यातीचे उद्दिष्ट
इजिप्तने २०२१मध्ये ६.१ दशलक्ष टन गहू आयात केला, मात्र इजिप्तच्या गहू निर्यातीच्या मान्यताप्राप्त देशांच्या यादीत भारताचा समावेश नव्हता. त्यावर्षी इजिप्तने आयात केलेल्या गव्हापैकी ८० टक्क्यांहून जास्त गहू रशिया आणि युक्रेनमधून आयात केला होता. भारताने १० दशलक्ष टन गहू निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे. तसेच भारतातून गव्हाची निर्यात वाढवण्याच्या संधींच्या विस्तारासाठी मोरोक्को, टय़ुनिशिया, इंडोनेशिया, फिलिपीन्स, व्हिएतनाम, तुर्की, अल्जेरिया आणि लेबनॉन येथे व्यापारी शिष्टमंडळे पाठवणार असल्याचे, माहिती कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे (अपेडा) अध्यक्ष एम. अंगमुथू यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community