लिंकडीन इंडियाने केलेल्या संशोधनानुसार, भारतातील स्त्रियांचा कल या वर्षी नोकरी सोडण्याकडे आहे. सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार, कार्यालयात होणारा पक्षपातीपणा हे मुख्य कारण असले तरी, 83 टक्के नोकरी करणा-या महिलांना कोरोना काळात हे समजले की त्यांना काम अधिक लवचिकपणे करता येणे शक्य आहे. 72 टक्के महिलांनी नोकरीसाठी नकार दिला आहे, तर 70 टक्के महिलांनी नोकरी सोडली आहे किंवा नोकरी सोडण्याचा विचार करत आहेत.
सर्वेक्षणातून काय आले समोर
कामामधील लवचिकतेचा फायदा विचारला असता, 5 पैकी 2 महिलांनी सांगितले की, करिअरमध्ये प्रगती करण्यास वाव मिळतो. तसेच, 3 पैकी 1 महिलेने मान्य केले की, कामामध्ये लवचिकता असेल, तर मानसिक आरोग्य सुधारते. तसेच, मुख्य कारण असेही आढळून आले की, लवचिकतेने काम करण्यासाठी या नोकरदार महिलांच्या पगारात कपात केली गेली. 5 पैकी 2 महिलांनी ही ऑफर नाकारली. तर 4 पैकी 1 महिलांना काम करताना संघर्ष करावा लागला. कामाच्या ठिकाणी होणा-या या पक्षपातीपणामुळे महिला वर्गाचा नोकरी सोडण्याकडे कल अधिक असल्याचे आढळून आले आहे.
म्हणून सोडताहेत महिला नोक-या
कामावर लवचिकतेने काम करण्यासाठी महिला नोकरदार वर्गाला पगारात कपात, पदोन्नती न देणे, ओव्हरटाईम, तसेच वरिष्ठांकडून मिळणारी पक्षपाती वागणूक या सगळ्याचा सामना करावा लगतो. या सर्व कारणांमुळे महिला वर्ग नोकरी सोडण्याच्या मानसिकतेत असल्याचे, लिंकडीनच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.