कितीही म्हटलं तरी नोटांचा पाऊस हा कधीच पडत नसतो. त्यासाठी नोटा या छापाव्याच लागतात. देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या RBI कडून देशातल्या नोटा छापण्यात येतात. 10 रुपयाच्या नोटेपासून 2000 हजाराच्या नोटा छापायला आरबीआयला सुद्धा खर्च येतो. याबाबत आता आरटीआयमधून माहिती समोर येत आहे.
200 रुपयांच्या नोटा छापण्यासाठी येणारा खर्च हा 500 रुपयांच्या नोटा छापायला लागणा-या खर्चापेक्षा जास्त आहे, अशी माहिती या आरटीआयमधून मिळत आहे. त्यामुळे 200 रुपयांच्या नोटा या 500 पेक्षा महाग झाल्याचे म्हटले जात आहे.
खर्चात झाली वाढ
नोटा छापण्यासाठी येणा-या खर्चाबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागवण्यात आली होती. त्याबाबत आरबीआयकडून माहिती देण्यात आली आहे. 500 पेक्षा 200 रुपयांच्या तर 20 रुपयांपेक्षा 10 रुपयांच्या नोटा छापायला जास्त खर्च येत असल्याची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. कागदाच्या वाढत्या किंमतींमुळे हा खर्च वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः खोट्या नोटा वाढल्या! RBI ने सांगितली धक्कादायक आकडेवारी)
कोणत्या नोटा छापायला किती येतो खर्च
- 10 रुपयांच्या एक हजार नोटा छापायला येणारा खर्च- 960 रुपये
- 20 रुपयांच्या एक हजार नोटा छापायला येणारा खर्च- 950 रुपये
- 50 रुपयांच्या एक हजार नोटा छापायला येणारा खर्च- 1 हजार 130 रुपये
- 100 रुपयांच्या एक हजार नोटा छापायला येणारा खर्च- 1 हजार 770 रुपये
- 200 रुपयांच्या एक हजार नोटा छापायला येणारा खर्च- 2 हजार 370 रुपये
- 500 रुपयांच्या एक हजार नोटा छापायला येणारा खर्च- 2 हजार 290 रुपये
त्यामुळे 200 रुपयांच्या नोटा छापायला येणारा खर्च हा 500 रुपयांच्या नोटांपेक्षा 80 रुपये जास्त आहे. आरबीआयकडून सध्या दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा छापणे बंद करण्यात आले आहे.
(हेही वाचाः नोटांवरच्या ‘या’ छोट्या अक्षरांमध्ये दडलंय मोठं ‘गुपीत’, खिशातल्या नोटा काढून चेक करा)
50 च्या नोटा छापायच्या खर्चात झाली वाढ
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात 50 रुपयांच्या हजार नोटा छापण्यासाठी 920 रुपये खर्च येत होता. यामध्ये 2021-22 या आर्थिक वर्षात 23 टक्के वाढ झाली असून, हा खर्च 1 हजार 130 रुपयांवर पोहोचला आहे.
Join Our WhatsApp Community