ही कंपनी करणार कोवॅक्सिन लसीसाठी औषधाचे उत्पादन

दर महिन्याला सुमारे 10-15 दशलक्ष लसींच्या डोससाठी लागेल एवढा औषध पुरवठा ही कंपनी करणार आहे.

94

देशात लसींचे उत्पादन वाढवण्यासाठी, केंद्र सरकारने मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील काही कंपन्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकीच राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या अखत्यारितील हैदराबाद येथील ‘इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड’(आयआयएल), या कंपनीला केंद्र सरकार औषध निर्मितीसाठी अर्थसहाय्य करणार आहे.

पुढच्या महिन्यापासून सुरू करणार उत्पादन

या संदर्भात भारत बायोटेक आणि आयआयएल यांच्यात कोवॅक्सिन लसीसाठी आवश्यक औषध निर्मितीबाबत तांत्रिक सहकार्य करार झाला आहे. इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड कंपनी, पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपासून, लसीसाठी आवश्यक औषधाचे उत्पादन सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने दिली आहे. जुलै महिन्यात भारत बायोटेकला औषधाची पहिली खेप पाठवली जाईल, अशी माहिती इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, डॉ के आनंद कुमार यांनी दिली आहे.

दर महिन्याला करणार इतक्या डोसचा पुरवठा

इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड दर महिन्याला सुमारे 10-15 दशलक्ष लसींच्या डोससाठी लागेल एवढा औषध पुरवठा करणे अपेक्षित असल्याचे, सांगत सुरुवातीला 2-3 दशलक्ष डोससाठी हे उत्पादन असेल आणि नंतर ते दर महिना 6-7 दशलक्ष पर्यंत वाढवले जाईल, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात येत आहे.

60 कोटींचे अनुदान

आयआयएल, आणखी एका कोविड-19 लसीसाठी काम करत असून, त्याच्या प्राण्यांवरच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. मानवासाठीची लस पुढच्या वर्षीपर्यंत येणे अपेक्षित आहे, असे डॉ कुमार यांनी सांगितले. आपली औषधक्षमता वाढवण्यासाठी इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेडला 60 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

भारत बायोटेकचे लक्ष्य

भारत बायोटेक कडून वर्षाला 20 कोटी अतिरिक्त कोवॅक्सिन लसींच्या उत्पादनाचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. तसेच उच्च प्रतीचे उत्पादन घेण्यासाठी भारत बायोटेक कटीबद्ध आहे, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. हैद्राबाद येथील भारत बायोटेकने हैद्राबाद आणि बंगळूर येथे कोवॅक्सिनचे उत्पादन सुरू केले असून, गुजरातमधील अंकलेश्वर येथे असलेल्या चिरॉन बेहरिंग सोबत कंपनी उत्पादन सुरू करणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.