आता हेल्पलाईन रोखणार आत्महत्या!

170

गेल्या दीड वर्षापासून देशासह राज्यात कोरोना महामारीचं संकट असल्याने अनेक जण बेरोजगार झाले, कित्येकांची नोकरी गेल्याने त्यांच्यापुढे आर्थिक समस्या उभ्या राहिल्यात. इतकेच नाही तर कोरोना महामारीदरम्यान, कोरोनाची लागण झाल्याने अनेक जण नैराश्यात गेले. निराशा आणि ढासळलेले मनस्वास्थ्य, त्यातही मानसिक ताण-तणाव असे अनेक गंभीर समस्यांमुळे काही मन खचलेल्या लोकांना आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले. मात्र आता एका हेल्पलाईनद्वारे हे आत्महत्या रोखण्यास मदत होणार आहे. इंडियन सायकियाट्रिक सोसायटीने राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक मदत क्रमांक सुरू केला आहे. जेणेकरून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे मन परिवर्तित होऊन तो व्यक्ती आत्महत्या करण्याच्या विचारापासून लांब जाऊ शकेल. या दूरध्वनी क्रमांकावर आतापर्यंत १७ जणांनी विचारणी केली असल्याचे सांगितले जात आहे.

हेल्पलाईनद्वारे अनेकांना होणार मदत

इंडियन सायकियाट्रिक सोसायटीच्या राष्ट्रीय आत्महत्या प्रतिबंधक दूरध्वनी क्रमांक १८००-५३२-०८०७ असा असून या हेल्पलाईन क्रमांकाद्वारे अनेकांना मदत केली जाणार असल्याचे सोसायटीद्वारे सांगितले जात आहे. वाढत्या आत्महत्या रोखण्याबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. तसेच त्यांनी असेही सांगितले की, आत्महत्या रोखण्याची स्थिती हाताळण्याचे कार्य या मदत क्रमांकाच्या सहाय्याने करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – ३१ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी अनिल परब राजीनामा द्या!)

आत्महत्या रोखण्याच्या दिशेने मोठं पाऊल

दरम्यान, मानसिक आरोग्याच्या समस्या असलेले नागरिक मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेण्यास किंवा संवाद साधण्यास टाळाटाळ करतात. अनेकदा अशा मदत क्रमांकाद्वारे दूरध्वनीवर बोलणे पसंत करतात. त्यातून त्यांचे नैराश्य पूर्णपणे नाहिसे होते असे नाही. पण प्राथमिक पातळीवरील संवाद साधणं गरजेचे असते. आकड्यांवर नजर टाकल्यास जगभरात दरवर्षी ५० टक्क्यांहून अधिक आत्महत्या भारत आणि चीनमध्ये होतात. हा मदत क्रमांक देशातील आत्महत्या रोखण्याच्या दिशेने मोठं पाऊल ठरणार असल्याचे इंडियन सायकियाट्रिक सोसायटीकडून सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.