रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! भारतातील पहिल्या ‘पॉड हॉटेल’चा शुभारंभ!

76

मध्य रेल्वेने नाविन्यपूर्ण कल्पनेने मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरू केल्यानंतर आता, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या अंतर्गत मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पहिले पॉड हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेच्या पहिल्या पॉड हॉटेलचे बुधवारी मुंबई सेंट्रल स्थानकावर उद्घाटन होणार आहे. रेल्वे प्रवासानंतर आरामदायी मुक्काम शोधणारे प्रवासी पॉड हॉटेलमध्ये चेक-इन करून राहू शकतात.

असे असतील पॉड हॉटेल!

मुंबई सेंट्रल स्थानकाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर हे हॉटेल बांधण्यात आले आहे. यात क्लासिक पॉड्स, प्रायव्हेट पॉड्स आणि महिलांसाठी स्वतंत्र पॉड्ससह ४८ कॅप्सूल सारख्या खोल्या आहेत. यात दिव्यांगांसाठी स्वतंत्र बेडही असतील. पॉड हॉटेलचे दर सर्व प्रवाशांसाठी १२ तासांसाठी ९९९ रुपये आणि २४ तासांसाठी १ हजार ९९९ रुपये एवढे असणार आहेत. तसेच, याठिकाणी खाजगी पॉड देखील उपलब्ध असणार आहेत. या किंमत एका खाजगी पॉडची किंमत १२ तासांसाठी १ हजार २४९ तर, २४ तासांसाठी २ हजार ४९९ रुपये एवढी असणार आहे. हॉटेलच्या सार्वजनिक कक्षात मोफत वाय-फाय, सामान कक्ष आणि प्रसाधन कक्ष असतील. प्रवाशांकडे दूरदर्शन, चार्जिंग पॉईंट आणि पॉड्सच्या आधुनिक सुविधा देखील आहेत. पॉड हॉटेलचे उद्घाटन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा : …तर शासकीय कर्मचाऱ्यांना काम करूनही मिळणार नाही पगार! )

पॉड हॉटेल म्हणजे काय ?

पॉड हॉटेल्सचा उगम जपानमध्ये झाला आहे. जपानी शैलीच्या पॉड हॉटेलमध्ये अनेक लहान कॅप्सूल सारख्या किंवा एक बेड राहील एवढ्या आकाराच्या खोल्या असतात, जिथे प्रवाशांना रात्रभर मुक्काम करता येतो. कॅप्सूल हॉटेल्स अतिथींसाठी स्वस्त व मूलभूत निवास प्रदान करतात. जगातील पहिले कॅप्सूल हॉटेल १९७९ मध्ये उघडले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.