राजधानी ट्रेनच्या जेवणाबाबत रेल्वेकडे आल्या ६,३६१ तक्रारी; प्रवाशांच्या सेवेसाठी आता करणार विशेष उपाययोजना

114

अलिकडे राजधानी एक्स्प्रेसच्या जेवणात झुरळ आढळल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत गेल्या तीन वर्षांत राजधानी गाड्यांमधील खानपान सेवांबाबत एकूण ६ हजार ३६१ तक्रारी रेल्वेला प्राप्त झाल्या आहेत. या प्रत्येक प्रकरणांची दखल घेत योग्य कारवाई करण्यात आल्याची माहिती रेल्वे, दूरसंवाद आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली आहे. तसेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने निश्चित केलेल्या विहित मानदंड आणि मानकांनुसार अधिसूचित प्रमाणानुसार चांगल्या दर्जाचे अन्न पुरवण्याचा भारतीय रेल्वेचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. राजधानी गाड्यांसह इतर रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहितीही मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा सुधारण्यासाठी हाती घेतलेले प्रमुख उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत…

  • बेस किचन/स्वयंपाकगृह युनिट्सचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे.
  • बेस किचन/स्वयंपाकगृहामध्ये स्वयंपाक तयार करत असताना प्रत्यक्ष देखरेख करण्याच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
  • राजधानी गाड्यांमध्ये भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ लिमिटेड (आय आर सी टी सी ) पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
  • आता खाद्यपदार्थांच्या पॅकेट्सवर QR कोड लावले आहेत ज्यावर किचनचे नाव, पॅकेजिंगची तारीख, कालबाह्यता तारीख, वजन इत्यादी तपशील दिले आहेत.
  • पॅन्ट्री कार आणि किचन युनिटमधील स्वच्छता आणि आरोग्यपूर्ण स्थिती तपासण्यासाठी तृतीय पक्ष लेखापरीक्षण केले जाते. ग्राहक समाधान सर्वेक्षण देखील केले जाते.
  • भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफ एस एस ए आय) च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होते आहे की नाही याची खातरजमा करण्यासाठी, प्रत्येक खानपान युनिटसाठी नियुक्त केलेल्या अन्न सुरक्षा अधिका-यांकडून प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.
  • अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या पद्धतींवर लक्ष ठेवण्यासाठी किचन युनिट्समध्ये अन्न सुरक्षा पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
  • अन्न सुरक्षा अधिकार्‍यांसह रेल्वे/आयआरसीटीसी अधिकार्‍यांकडून नियमित आणि आकस्मिक तपासणी केली जाते.

प्रवाशांनी येथे करावी तक्रार

प्रवाशांचा अभिप्राय आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी Rail Madad, Twitter handle @ IR CATERING, CPGRAMS, ई-मेल आणि एसएमएस यांची एक प्रणाली विकसित केली असल्याचे मंत्री अश्विनी वैष्णव सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.