भारतीय रेल्वेकडून भ्रष्ट आणि कामचुकार कर्मचा-यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या 16 महिन्यांत रेल्वेच्या सेवेतून तब्बल 177 कर्मचा-यांना रेल्वेने सेवेतून काढून टाकले आहे. जुलै 2021 पासून दर तीन दिवसांत एका तरी भ्रष्ट अधिका-याला किंवा कामचुकार कर्मचा-याची रेल्वेने सेवेतून हकालपट्टी केली आहे. रेल्वेने केलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.
इतक्या कर्मचा-यांवर कारवाई
नारळ देण्यात आलेल्या 177 कर्मचा-यांपैकी 139 अधिका-यांना सक्तीची स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली आहे, तर 38 कर्मचा-यांची सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2021 पासून इलेक्ट्रिकल,सिग्नलिंग,स्टोअर,मेकॅनिकल इत्यादी विभागातील रेल्वे कर्मचा-यांवर रेल्वेकडून कारवाई करण्यात आली आहे. तसेच यापुढेही रेल्वेकडून दोषी कर्मचारी आणि अधिका-यांवर अशाच प्रकारे कारवाई करण्यात येईल, असेही सांगितले जात आहे.
(हेही वाचाः मलेरियावरचं औषध बनवणारी कंपनी ते पिण्याच्या पाण्याचा Brand, Bisleriचा इतिहासच Grand)
सेवेत चोख राहण्यासाठी प्रयत्न
भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना कायमच उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्न करत असते. त्यामुळे आपल्या सेवेमध्ये काहीही कमी पडणार नाही, याकडे रेल्वेचा कटाक्ष असतो. हाच विचार करुन भ्रष्ट किंवा कामचुकार कर्मचारी आणि अधिका-यांवर रेल्वेने कारवाईचा बडगा उगारला आहे.