नोकरी किंवा शिक्षणानिमित्त परदेशी जाणा-या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणे बंधनकारक आहे. अशा नागरिकांसाठी आरोग्य मंत्रालयाकडून कोविशिल्डच्या दोन डोसमधील वाढीव कालावधी सुद्धा कमी करण्यात आला आहे. पण तरीही युरोपात जाणा-या ज्या भारतीयांनी कोविशिल्ड लस घेतली आहे, त्यांना युरोपियन युनियनमधील देशांत जाण्यास परवानगी मिळत नसल्याची माहिती समोर येत आहे. याची दखल सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी घेतली असून, याबाबत आपण नक्कीच ठोस पावले उचलणार असल्याचे त्यांनी ट्वीट करत सांगितले आहे.
काय आहे पुनावाला यांचे ट्वीट?
कोविशिल्ड लस घेतलेल्या नागरिकांना युरोपियन युनियन मधील देशांत प्रवास करण्यासाठी अडथळा येत असल्याचे मला कळले आहे. मी याबाबतची दखल घेतली असून, नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळावी म्हणून मी नक्कीच उच्च स्तरावर प्रयत्न करेन, असे आश्वासन अदर पुनावाला यांनी दिले आहे. देशांसोबत चर्चा करुन राजकीय आणि नियामक पातळीवर हा तिढा लवकरात लवकर सोडवण्यात येईल अशी आशा व्यक्त करतो, असेही त्यांनी ट्वीट करत म्हटले आहे.
I realise that a lot of Indians who have taken COVISHIELD are facing issues with travel to the E.U., I assure everyone, I have taken this up at the highest levels and hope to resolve this matter soon, both with regulators and at a diplomatic level with countries.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) June 28, 2021
(हेही वाचाः बोगस लसीकरण : मुख्य आरोपीची बँक खाती गोठवली!)
कोविशिल्डला मान्यता नाही
युरोपियन युनियनच्या वैद्यकीय नियामक मंडळातील युरोपियन मेडिसीन एजन्सीने चार लसींना मान्यता दिली आहे. यामध्ये अॅस्ट्राझेनेका तर्फे युरोपात तयार करण्यात आलेल्या आणि विक्री होत असलेल्या व्हॅक्सर्व्हेरिया लसीचा समावेश आहे. पण अॅस्ट्राझेनेकातर्फेच भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होत असलेल्या कोविशिल्डला परवानगी देण्यास युरोपियन युनियन मधील देशांनी नकार दिला आहे.
Join Our WhatsApp Community