भारताने आपल्या जी-20 अध्यक्षीय काळात, परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या वार्षिक महत्त्वपूर्ण पूर्ण बैठकीतील फलनिष्पत्तीविषयक दस्तऐवज आणि अध्यक्षीय सारांश पूर्ण वाटाघाटी अंती स्वीकारण्यात आलेला पहिला देश म्हणून आघाडी घेतली. या सर्वसमावेशक दस्तऐवजामध्ये बहुपक्षीयता मजबूत करणे, दहशतवादाविरुद्ध लढा आणि जागतिक आरोग्याशी निगडित विविध पैलूंसह सदस्य राष्ट्रांशी निगडित इतर अनेक महत्त्वाच्या संकल्पना अधोरेखित करण्यात आल्या आहेत.
भारताच्या जी-20 अध्यक्षतेच्या काळातच ग्लोबल साउथचा आवाज बुलंद करणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिट 2023’ चे यजमानपद भारताने भूषवले. या दोन दिवसीय परिषदेत झालेल्या दहा सत्रांमध्ये 125 देशांनी सहभाग घेतला, या ऐतिहासिक घटनेने सहभागी देशांना विकसित जगासमोरील आव्हाने, अभिनव कल्पना, समस्या आणि प्राधान्यक्रमांविषयी आवाज उठवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले.
(हेही वाचा – G-20 Summit : दिल्लीतील शिखर संमेलनात उलगडणार 5 हजार वर्षांचा इतिहास,पाहुण्यांच्या स्वागतासाठी करणार AI अँकर)
भारताच्या जी-20 अध्यक्षतेच्या काळात आयोजित केलेल्या कृषीक्षेत्रातील मुख्य शास्त्रज्ञांच्या बैठकीत (MACS) जी-20 चा एक उपक्रम असलेल्या “भरड धान्य आणि इतर प्राचीन धान्य आंतरराष्ट्रीय संशोधन उपक्रम” (MAHARISHI) चे अनावरण झाले, ज्यायोगे संशोधक आणि संस्था यांना जोडणारा दुवा म्हणून एक मजबूत यंत्रणा विकसित होऊ शकली तसेच जी-20 सदस्यांमध्ये माहितीचे आदानप्रदान आणि क्षमता निर्माण उपक्रम निर्मिती करणे शक्य झाले.
भारताच्या जी-20 अध्यक्षतेअंतर्गत जी-20 सक्षमीकरण (एम्पॉवर) गटाची स्थापना बैठक झाली. महिलांच्या आर्थिक प्रतिनिधित्वाचे सक्षमीकरण आणि प्रगतीसाठी जी 20 आघाडी (एम्पॉवर) ही जी 20 समूहातील देशांचे व्यापार धुरिणांची आणि सरकार यांची आघाडी आहे, खाजगी क्षेत्रातील महिलांचे नेतृत्व आणि सक्षमीकरणाला गती देणे हे याचे उद्दिष्ट आहे.
जी 20 डिजिटल अर्थव्यवस्था मंत्र्यांच्या बैठकीनंतर, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीकरता एकमत साध्य झाले. याशिवाय डिजिटल अर्थव्यवस्थेतील सायबर सुरक्षा आणि डिजिटल कौशल्य यावर देखील सर्वसहमती झाली.
जी 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात, जी 20 देशांच्या मुख्य विज्ञान सल्लागारांची (जी 20- सीएसएआर) गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली, यामध्ये उत्तम रोग नियंत्रण आणि साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी तयारी करतानाच्या संधी, विद्वत्तापूर्ण वैज्ञानिक ज्ञानाच्या उपलब्धतेचा विस्तार करण्यासाठी जागतिक प्रयत्नांचा समन्वय साधणे, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये विविधता, समानता, समावेश आणि प्रवेशयोग्यता, सर्वसमावेशक, सतत आणि कृती-केंद्रित जागतिक विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण संवादासाठी एक संस्थात्मक यंत्रणा अशा महत्वपूर्ण विषयांवर विचारमंथन झाले.
बहुस्तरीयता सुधारण्याच्या आणि सक्षम करण्याच्या प्रयत्नानांतर्गत भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि बहुस्तरीय विकास बँका (MDBs) यांसह आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सुधारणांबाबतच्या चर्चांना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणले. भारताच्या जी -20 अध्यक्षतेखाली,बहुस्तरीय विकास बँकांच्या बळकटीकरणासाठी शिफारसी आणि 21 व्या शतकासाठी या बँकांच्या कार्यक्षमतेचा विस्तार यावर विचारमंथन करण्यासाठी “बहुस्तरीय विकास बँका (एमडीबी ) बळकट करणे” या विषयावर एक जी 20 तज्ञ गट स्थापन करण्यात आला.
हेही पहा –