- ऋजुता लुकतुके
एप्रिल ते जून तिमाहीत भारताची रशियाकडून होणारी आयात दुपटीने वाढली आहे. यात रशियाकडून होणाऱ्या तेलाच्या आयातीत ४० टक्के वाढ झाली आहे. भारताची रशियाकडून होणारी आयात आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्य तिमाहीच दुपटीने वाढली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जून तिमाहीत आपण २०.४५ अब्ज अमेरिकन डॉलरचा माल रशियातून आयात केला. गेल्यावर्षी याच कालावधीत हे प्रमाण १० अब्ज अमेरिकन डॉलर इतकं होतं.
यंदाच्या आयातीत सर्वाधिक वाटा अर्थातच कच्चं तेल आणि रासायनिक खतांचा होता. रशिया हा आता भारताचं चौथं मोठं आयातीचं केंद्र बनला आहे. रशिया-युक्रेन युद्धापूर्वी भारत जेवढं कच्च तेल आयात करत होता, त्यापैकी रशियाचा वाटा फक्त १ टक्के होता. तोच आता वाढून ४० टक्क्यांवर आला आहे. युद्धादरम्यान रशियाशी असहकार म्हणून पाश्चिमात्य देश आणि खासकरून अमेरिकेनं रशियाकडून कच्च तेल विकत घेणं बंद केलं होतं. त्यामुळे रशियाने भारताला सवलतीच्या दरात तेल देऊ केलं. शिवाय हे व्यवहार बऱ्याच प्रमाणात रशियन रुबेल्समध्ये करण्याची मुभाही दिली. त्यामुळे एकतर भारताला तेल स्वस्तात मिळालं. आणि व्यवहार रुबेल्समध्ये होत असल्याने देशाचं परकीय चलनही वाचलं.
भारत हा जगातील तिसरा मोठा तेल आयातदार देश आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीत, भारताच्या एकूण आयातीवरही प्रकाश टाकण्यात आला आहे. आणि त्यामध्ये भारताची चीनकडून आयातही कमी झाल्याचं दिसतंय. चीनकडून आपण ३२.७ अब्ज अमेरिकन डॉलर मूल्याचा माल आयात केला. हेच प्रमाण गेल्यावर्षी ३४ अब्ज डॉलरच्या वर होतं. भारताची अमेरिका आणि संयुक्त अरब अमिरातीकडून होणारी आयातही कमी झाली आहे. याला कारण, अर्थातच आपण रशियाकडून घेत असलेलं तेल हे आहे. त्यामुळे आपल्या अरब देशांकडून तेल घेण्याची फारशी गरज उरली नाही.
(हेही वाचा – Marathwada Drought : जायकवाडी धरणात केवळ 34 टक्के पाणीसाठा; मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट)
देशाची आयात काही प्रमाणात कमी झालेली असताना निर्यातीचं चित्र मात्र आश्वासक नाहीए. भारत निर्यात करत असलेल्या पहिल्या दहा देशांमध्ये निर्यातीचं प्रमाण कमी झालं आहे. अमेरिका, युएई, चीन, सिंगापूर, जर्मनी, बांगलादेश आणि इटली इथं निर्यात कमी झाली आहे. आपण बहुतेक करून कृषिमाल निर्यात करतो. पण, देशांतर्गत उत्पादन यंदा अनियमित होतं. त्यामुळे केंद्रसरकारने अलीकडे तांदळाच्या काही जातींच्या निर्यातीवर बंदी आणली होती. भारताची युके, नेदरलँड्स आणि सौदी अरेबिया या देशांना होणारी निर्यात या तिमाहीत वाढलेली दिसली. या तिमाहीत देशाची निर्यात १५ टक्क्यांनी कमी झाली. पण, आयात त्याहून जास्त म्हणजे १७ टक्क्यांनी कमी झाली. ही गोष्ट समाधानकारक आहे. कारण, त्यामुळे देशाची व्यापारी तूट कमी झाली आहे. हे प्रमाण २० टक्के इतकं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community