भारत सरकारने प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी तसेच सिंगल यूज प्लास्टिकवर मर्यादा येण्यासाठी दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. तरीसुद्धा मागच्या पाच वर्षांत प्लास्टिक कच-याच्या निर्मीतीत दुपटीने वाढ झाली आहे. तसेच कोरोना काळात प्लास्टिकचा वापर प्रचंड वाढला आहे. भारतातील प्लास्टिक कचऱ्याची निर्मिती गेल्या पाच वर्षांत सरासरी 21.8% च्या वार्षिक वाढीसह दुप्पट झाली आहे, असे केंद्राने सोमवारी सांगितले.
प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण दुपटीने वाढले
2019-20 मध्ये 34 लाख टन आणि 2018-19 मध्ये 30.59 लाख टनांपेक्षा जास्त प्लास्टिक कचरा निर्माण झाला. असं संसदेच्या कनिष्ठ सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी चौबे म्हणाले. पर्यावरण मंत्री चौबे यांनी सांगितलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत देशातील प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. 2015-16 मध्ये देशात 15.89 लाख टन प्लास्टिक कचरा निर्माण झाला होता. देशातील घनकचरा, प्लास्टिक कचरा, ई-कचरा, जैव-वैद्यकीय कचरा आणि घातक कचरा यावरील वार्षिक डेटा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळद्वारे संकलित केला जातो, असे पर्यावरण मंत्रालयाने सांगितले.
दररोज निर्माण होतोय इतके टन कचरा
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने घातक कचऱ्यावर केलेल्या अभ्यासाच्या आधारे आणि इतर कचऱ्याच्या संदर्भात संकलित केलेल्या डेटाच्या आधारे, घातक कचऱ्याच्या निर्मितीमध्ये सरासरी वार्षिक वाढ दोन टक्के आहे, जैव-वैद्यकीय कचऱ्यामध्ये 5.8 टक्के, घन कचरा 0.1 टक्के आणि प्लॅस्टिक कचरा 21.8 टक्के एवढी वाढ झाल्याचे मंत्र्यांनी त्यांच्या लेखी उत्तरात सांगितले आहे. पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1986 अंतर्गत अधिसूचित केलेल्या विविध नियमांमधील तरतुदींनुसार संबंधित राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ/प्रदूषण नियंत्रण समित्यांकडून डेटा गोळा केला जातो,असे अश्विनी चौबे यांनी यावेळी सांगितले. 2020 मध्ये भारतात दररोज 677 टन जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला. तर 2019 मध्ये प्रतिदिन 619 टन जैववैद्यकीय कचरा निर्माण झाला. 2015 मध्ये, भारतात जैववैद्यकीय कच-याची निर्मिती प्रतिदिन 502 टन होती, असे डेटा दर्शवतो असे अश्विनी चौबे पुढे म्हणाले.
( हेही वाचा आंबेडकर – सावरकर वैचारिक साम्यता… )
Join Our WhatsApp Community