Air India च्या भरतीसाठी IndiGo च्या चालक दलाचे सदस्य आजारपणाची सुट्टी टाकून गेल्याने इंडिगोच्या देशांतर्गत विमान उड्डाणावर त्याचा थेट परिणाम झाला. इंडिगोच्या 55 टक्के उड्डाणांना शनिवारी उशीर झाला. या प्रकरणाची डीजीसीए चौकशी करणार आहे.
याबाबत विचारणा केली असता, नागरी विमान महासंचालनालयाचे प्रमुख अरुण कुमार यांनी सांगितले की, याबाबत माहिती घेतली जात आहे. एअर इंडियाच्या भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. आजारी सुट्टी टाकून इंडिगोचे बहुतांश चालक एअर इंडियाच्या भरतीसाठी गेले होते. त्यामुळे अनेक उड्डाणांना सुमारे तासभर उशीर झाला. इंडिगो सध्या रोज जवळपास 1 हजार 600 देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे संचालन करते. इंडिगोला याबाबत विचारणा केली असता, कंपनीकडून प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
( हेही वाचा: EPFO: PF खातेधारकांनो, चुकूनही करू नका ‘या’ चूका, नाहीतर होईल मोठे नुकसान )
सेवेत सुधारणा करण्यासाठी योजना
टाटा समूहाने यावर्षी 27 जानेवारी रोजी एअर इंडियाचे नियंत्रण आपल्या हातात घेतले. आता एअर इंडियाने चालक दलाच्या नव्या सदस्यांसाठी भरती मोहीम सुरु केली आहे. नवीन विमान खरेदी करणे आणि आपल्या सेवेत सुधारणा करण्याची योजना एअर इंडियाकडून आखण्यात येत आहे.
45 टक्के विमानांना विलंब
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, इंडिगोच्या 45.2 टक्के विमानांनी शनिवारी वेळेवर उड्डाण केले. त्या तुलनेत शनिवारी एअर इंडिया, स्पाइसजेट, विस्तारा, गो फर्स्ट आणि एअर एशिया इंडियाची क्रमश: 77.1 टक्के, 80.4 टक्के, 86.3 टक्के, 88 टक्के आणि 92.3 टक्के उड्डाणे वेळेवर झाली.
Join Our WhatsApp Community