कोविडचे निदान झाल्यावर उपचार सुविधांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘एमएचसीसीएमएस’ (MHCCMS) अर्थात ‘कोविड केअर मॅनेजमेंट सिस्टीम‘ या मोबाईल अॅपची निर्मिती केली असून या मध्यमातून नागरिकांनी माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिकआरोग्य विभागाने हे अॅप तयार केले असून www.mahacovid.jeevandayee.gov.in या लिंकवरून तुम्ही हे अॅप डाऊनलोड करू शकता.
विविध प्रकारची माहिती उपलब्ध
या शिवाय गुगल प्ले स्टोअरवरही हे अॅप उपलब्ध आहे. हे अॅप डाऊनलोड केल्यावर आपण आपला जिल्हा, तालुका आदी निवडल्यावर आपल्या भागातील उपलब्ध बेड संख्या, कोणत्या हॉस्पिटल मध्ये किती बेड उपलब्ध आहेत. त्यातही ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर सुविधा, अतिदक्षता विभाग, साधे बेड या प्रमाणे वर्गीकरण उपलब्ध आहे. तसेच महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची सुविधा उपलब्धता व अशी विविध प्रकारची माहिती यात उपलब्ध करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाचे आवाहन
या शिवाय अन्य जिल्ह्यातील माहितीही नागरिकांना पाहता येणार आहे. तसेच रुग्णालयातील नोडल अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे. सामान्य नागरिकांना ही माहिती पाहता येणार आहे. जेणेकरून त्यांना आपल्या घरातील रुग्णाच्या उपचाराबाबत मार्गदर्शन मिळेल. याशिवाय प्रशासकीय अधिकाऱ्यांना युजर आयडी व पासवर्ड द्वारे, औषधांची उपलब्धता, ऑक्सिजन उपलब्धता याबाबतची माहितीही जिल्हास्तरावरील नियोजनासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. सर्व नागरिकांनी या अॅपचा वापर कोविड उपचार सुविधा माहितीसाठी करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Join Our WhatsApp Community