BMC : रस्त्यालगतच्या झाडांना नवसंजीवनी देण्यासाठी महापालिकेने हाती घेतला उपक्रम; ‘या’ दिवसापासून होणार सुरुवात

67
मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील वृक्षांच्या संवर्धनासाठी महानगरपालिकेने (BMC) १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत ‘वृक्ष संजीवनी अभियान २.०’ (Vruksha Sanjeevani Abhiyan 2.0) हाती घेतले आहे. हे अभियान मुंबईतील रस्त्यालगतच्या वृक्षांना नवसंजीवनी देण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी समर्पित आहे.

मुंबई महानगरपालिका हद्दीतील वृक्ष संपदा अधिक बहरावी, यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपक्रम सातत्याने हाती घेत असते.  मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या निर्देशानुसार आणि उप आयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक १५ एप्रिल ते  ३० एप्रिल २०२५ या कालावधीत ‘वृक्ष संजीवनी अभियान २.०’ हाती घेतले आहे.
महानगरपालिकेने सन २०२२ मध्ये सर्वप्रथम हे अभियान हाती घेतले होते. पहिल्या टप्प्याच्या यशानंतर आता दुसरा टप्पा हाती घेण्यात आला आहे. या अभियानात वृक्षांवरील खिळे, जाहिरातीचे बॅनर/पोस्टर्स, वायर्सचे जंजाळ, वृक्षांच्या मुळाशी झालेले काँक्रिटीकरण काढून टाकण्यावर भर दिला जाईल.
या अभियानासाठी महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत पुरेसे मनुष्यबळ, साहित्य आणि उपकरणांसह सुसज्ज पथके तैनात केली आहेत. ही पथके प्रत्येक प्रशासकीय विभागातील (वॉर्ड ऑफिस ) रस्त्यालगतच्या वृक्षांवर नियोजनबद्ध पद्धतीने कामे करतील.
हे अभियान परिरक्षण, अनुज्ञापन, विद्युत आणि रस्ते विभागांच्या समन्वयाने राबवले जाईल, जेणेकरून अभियान प्रभावीपणे आणि विनाअडथळा पार पडू शकेल.
सर्व नागरिक, पर्यावरण प्रेमी, स्वयंसेवी संस्था (NGO), विद्यार्थ्यांना आणि इच्छुक नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येते की, त्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा आणि मुंबईच्या हरित वारशाच्या संवर्धनात योगदान द्यावे.
‘वृक्ष संजीवनी अभियान २.०” हे केवळ एक हरित संपदा राखण्यासाठी औपचारिक स्वच्छता अभियान नसून, वृक्षांना नवसंजीवनी देण्यासाठी लोकसहभागातून उभी राहणारी ही चळवळ आहे, अशी भावना महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी व्यक्त केली आहे.
हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.