रस्ता पार करताना या संकटग्रस्त गर्भवती कासवाची अंडी फुटली

153

नाहूर येथील गोरेगाव-मुलुंड लिंक रोड पार करताना इंडियन फ्लॅप शेल या संकटग्रस्त कासवाला वाहनाची धडक लागल्याने अपघात झाला. मादी इंडियन फ्लॅप शेल कासवाच्या शरीरातील अंडीही या धडकेत फुटली. कासवाला जखमी अवस्थेतच खासगी पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करावे लागले. सुदैवाने अपघातात कासवाला गंभीर जखमा झाल्या नाहीत. कासवाचा जीव वाचला तरीही पोटातील दोन अंडी तिने गमावली तर दोन अंडी सुखरुप राहिली.

अपघातात दोन अंडी फुटली

गेल्या आठवड्यात ही घटना घडली. नाहूर येथील गोरेगाव-मुलुंडला लागून असलेला रस्त्याच्या मधोमध इंडियन फ्लॅप शेल कासव अडकल्याचे ओम फाऊंडेशन या समाजसेवी संस्थेच्या कार्यकर्त्याला दिसले. कार्यकर्त्यांनी कासवाला रस्त्याच्या मध्यभागावरुन सुखरुप उचलले. या कासवाबाबत माहिती मिळताच रेसकिंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (रॉ) या प्राणीप्रेमी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी जखमी कासवाला पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रिना देव यांच्याकडे उपचारांसाठी नेले. तपासणीदरम्यान कासव गर्भवती असल्याचे समजले. शरीरातील चार अंड्यांपैकी दोन अंडी फुटल्याचे दिसून आले. कासवाला थोड्या जखमाही झाल्या होत्या. अपघातामुळे कासव मानसिक ताणात असल्याचे पशुवैद्यकीय अधिका-यांना जाणवले.

tortoise 2

(हेही वाचाः महिन्याभरात दुसऱ्यांदा सज्जनगडाच्या पायथ्याशी सापडला बिबट्याचा बछडा पण…)

कासवावर उपचार सुरू

हे कासव मुळात गोड्या पाण्यात राहते. तलाव परिसरांत या कासवाचे दर्शन घडते. मात्र वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे तसेच जलप्रदूषणामुळे इंडियन फ्लॅप शेल टर्टल या कासवाला इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नॅचरने संकटग्रस्त म्हणून घोषित केले आहे. सध्या या कासवावर उपचार सुरु आहेत. उपचार यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर वनविभागाशी चर्चा करुन कासवाला नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल, अशी माहिती संस्थेचे संस्थापक व ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक अॅड. पवन शर्मा यांनी दिली.

tortoise

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.