केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नियोजनानुसार भारताच्या ७,५०० किलो मीटर लांबीच्या किनार पट्टीवर राबविण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत देशभारातील ७५ समुद्र किना-यांवर ७५ दिवसांची ही मोहीम राबविण्यात आली. मुंबई महानगरपालिकेनेही देशभरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत आपला खारीचा वाटा उचलला आहे. मुंबईतील गिरगांव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ-मार्वे-आक्सा, गोराई-मनोरी या ७ प्रमुख चौपाट्यांवर ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध स्वयंसेवी संस्था यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला. या मोहिमेचा सांगता समारंभ शनिवारी १७ सप्टेंबर रोजीच्या सागरी किनारा स्वच्छता आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष स्वच्छता अभियानाद्वारे होणार आहे, अशी माहिती घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या उप आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी दिली आहे.
( हेही वाचा : मुंबईच्या सौंदर्यीकरणाच्या आड येणाऱ्या अनधिकृत केबल्स, लटकलेल्या तारा तात्काळ हटवा! )
७५ दिवसांची ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर / स्वच्छ किनारा, सुरक्षित समुद्र’ ही मोहीम
भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने ५ जुलै २०२२ पासून ७५ दिवसांची ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर / स्वच्छ किनारा, सुरक्षित समुद्र’ ही मोहीम सुरु करण्यात आली. केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नियोजनानुसार भारताच्या ७,५०० किलो मीटर लांबीच्या किनार पट्टीवर राबविण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत देशभारातील ७५ समुद्र किना-यांवर ७५ दिवसांची ही मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेल्या कार्यवाही अंतर्गत मुंबईतील गिरगांव, दादर, माहीम, जुहू, वर्सोवा, मढ-मार्वे-आक्सा, गोराई-मनोरी या ७ प्रमुख चौपाट्यांवर ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध स्वयंसेवी संस्था यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला.
मुंबई महानगरपालिकेतर्फे समुद्र किनारे साफ करणारी विशेष यंत्रणा आहेच. परंतु त्या व्यतिरिक्त ५ जुलै २०२२ ते १५ सप्टेंबर २०२२ पर्यंत वेगवेगळ्या संस्था, स्वयंसेवक, विविध वयोगटातील नागरिकांचे गट, शाळा – महाविद्यालयांमधील विद्यार्थी यांनी २५ टनांपेक्षा जास्त प्लास्टिक कचरा गोळा केला. या कच-याचे पुनर्वर्गीकरण करुन २ टनांपेक्षा जास्त कचरा पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला.
‘सागरी किनारा स्वच्छता आंतरराष्ट्रीय दिन’
शनिवारी १७ सप्टेंबर २०२२ रोजी मुंबईतील प्रमुख समुद्र किना-यांवर ‘सागरी किनारा स्वच्छता आंतरराष्ट्रीय दिन’ साजरा करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाकडून त्यांच्या अखत्यारितील समुद्र किनाऱयावर विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पृथ्वी विज्ञान मंत्रालय, तटरक्षक दल, भारतीय नौदल, खादी ग्रामोद्योग यासारख्या विविध शासकीय संस्थांसोबतच अनेक स्वयंसेवी संस्था देखील सहभागी होणार आहेत. समुद्र किना-यांच्या या स्वच्छतेचा कार्यक्रम हा सकाळी ६ वाजता सुरु होत असून तो सकाळी ११ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. या कार्यक्रमा दरम्यान समुद्र किना-यांची स्वच्छता, गुणवंत कर्मचारी – संस्था यांना प्रशस्तीपत्र वितरण, कौतुक सोहळा, उपस्थितीतांचे आभार अशा विविध बाबींचा समावेश असणार आहे, असेही डॉ. हसनाळे यांनी यानिमित्ताने आवर्जून नमूद केले आहे.
मुंबईकर नागरिकांना विविध नागरी सेवा-सुविधा देणारी आपली मुंबई महानगरपालिका मुंबईच्या स्वच्छता आणि साफसफाईसाठी अव्याहतपणे कार्यरत असते. या अंतर्गत मुंबईतील समुद्र किनाऱ्यांची स्वच्छताही नित्यनेमाने केली जाते. कुलाबा पासून सुरु होणारा मुंबईचा समुद्रकिनारा गोराई पर्यंत पसरला आहे. या सुमारे ३५ किलो मीटर लांबीच्या पश्चिम समुद्र किना-यांची स्वच्छता राखताना कुशल कर्मचाऱ्यांसोबत आधुनिक यंत्रांचाही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. शाळा – महाविद्यालयांचे विद्यार्थी, स्वयंसेवक, समुद्र किनाऱयांवरील विक्रेते, रहिवाशी, शासकीय संस्था, स्वयंसेवी संस्था, तटरक्षक दल, नौदल इत्यादींच्या सहकार्याने नाविण्यपूर्ण कार्यक्रम हाती घेतले व त्याची सातत्यपूर्ण अंमलबजावणी केली.
मुंबई शहरातील गिरगांव, दादर, माहीम, वांद्रे, जुहू-वर्सोवा, मढ-मार्वे-आक्सा, गोराई-मनोरी या उल्लेखनीय चौपाट्या आहेत. या चौपाट्यांवर पर्यटकांची विशेष गर्दी असते. या ठिकाणी येणा-या पर्यटकांच्या मनात असणारी स्वच्छता व समुद्र किना-यांबाबतची आस्था वृद्धिंगत व्हावी, यासाठी वेळोवेळी करण्यात आलेल्या आवाहनांना पर्यटकांनी स्वयंस्फूर्तीने चांगला प्रतिसाद दिला. याव्यतिरिक्त समुद्र किनारे, समुद्र इत्यादींची स्वच्छता, कच-याचे समुद्रातील जलचरांवर होणारे प्रतिकूल परिणाम आदीबाबत भित्तीपत्रके, फलक, पथनाट्य इत्यादींद्वारे नियमितपणे जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर संवाद कार्यक्रम, चर्चासत्र इत्यादींचे देखील आयोजन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी, नागरिक, विविध संस्था – संघटनांनी मोठ्या हिरिरीने भाग घेतला.
Join Our WhatsApp Community