महानगरपालिकेमध्ये सेवा बजावत असताना समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्तबगार महिलांचा, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, महानगरपालिकेच्या नियोजन विभागामार्फत बुधवारी, ८ मार्च २०२३ रोजी समारंभपूर्वक गौरव करण्यात येणार आहे. त्यासोबत कलागुण सादरीकरणाचा कार्यक्रमही होणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (नियोजन) प्रशांत सपकाळे यांनी दिली आहे.
महिलांना सन्मानपूर्वक आयुष्य बहाल करण्यासाठी महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त (नियोजन) विभागाद्वारे विविध कल्याणकारी योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक महिला दिन (८ मार्च) प्रीत्यर्थ महिलांचा सन्मान करण्यासाठी दादर येथील वनिता समाज सभागृहात सोहळा होणार असून त्यात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत विविध कार्यक्रम देखील होणार आहेत. महानगरपालिकेच्या विविध विभाग तथा खात्यांमध्ये कार्यरत राहून उल्लेखनीय कार्य, समाज कार्य करणाऱ्या महिलांचा या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या विविध विभागात कार्यरत महिला अधिकारी व महिला कर्मचारी यांना कलागुण सादर करण्याची संधीही यानिमित्ताने मिळणार आहे.
(हेही वाचा तुर्कीने काश्मीर मुद्यावरून भारताला केले लक्ष्य; सोशल मीडियात संताप, काय म्हणतात नेटकरी?)
महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी तसेच त्यांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी केले आहे.