जागतिक महिला दिनी मुंबई पोलीस आयुक्त यांनी महिला पोलीस अमलदारांना ८ तास ड्युटीचे बक्षीस दिले आहे. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी परिपत्रक काढून तसा आदेश सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिला असून या आदेशाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याची सूचना पांडे यांनी दिली आहे. यापुढे पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अमलदार तीन शिफ्टमध्ये आपले कर्तव्य बजावताना दिसून येतील.
जेष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी नेमणूक झाल्यानंतर पांडे यांनी पोलीस दलातील अधिकारी, अमलदार तसेच मुंबईकरासाठी नवीन नवीन योजना लागू करण्यास सुरुवात केली आहे. सर्वात प्रथम पांडे यांनी मुंबईकरांना आपला खाजगी मोबाईल क्रमांक शेअर करून मुंबईकरांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावर तोडगा काढण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर पोलीस दलातील अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी फेसबुक लाईव्ह सुरू करून त्यांच्या समस्या ऐकत आहे.
रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांना टोइंग करण्यात येऊ म्हणून प्रायोगिक तत्वावर प्रयत्न सुरू करून पांडे यांनी मुंबईकरांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर जेष्ठ नागरिकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आठवड्यातून दोन दिवस या नागरिकांच्या घरी बिट मार्शल तसेच अधिकारी यांनी भेट देऊन त्यांच्या प्रकृतीबाबत तसेच त्यांच्या इतर काही समस्या जाणून त्या तात्काळ सोडविण्याचा आदेश प्रत्येक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिला आहे.
(हेही वाचा आतापर्यंत प्रभाग रचनेचे झालेले काम बनले रद्दी, पुनःश्च हरिओम!)
याआधी घेतलेला निर्णय, पण…
मागील काही वर्षांपासून मुंबई पोलीस दलात अंमलदार यांना आठ तास ड्युटी करावी यासाठी अनेक पोलीस अमलदारांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. प्रायोगिक तत्वावर आठ तास ड्युटी करण्यात आली, मात्र मनुष्यबळा अभावी पुन्हा १२ तास ड्युटी करावी लागत असल्यामुळे पोलीस अमलदार विशेष करून महिला अमलदार यांच्यात नाराजी दिसून येत होती.
प्रत्येक पोलीस ठाण्याला लेखी आदेश
अखेरीस पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी महिला दिनाचे औचित्य साधून मुंबई पोलीस दलातील महिला अंमलदार यांना महिला दिनी भेट म्हणून आठ तासांची ड्युटी बहाल केली आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त यांनी सोमवारी काढले असून मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना हे लेखीआदेश पाठविण्यात आले असून लवकरात लवकर या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी असे म्हटले आहे.
…अशी असणार ८ तासांची ड्युटी!
- मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी आपल्या लेखी आदेशात वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना आठ तास ड्युटी करण्याबाबत दोन पर्याय दिले असून या दोन पर्याय पैकी एक पर्याय निवडून त्याप्रमाणे महिला अंमलदार यांना ड्युटीचे वाटप करण्यात यावे असे म्हटले आहे. महिला पोलीस अमलदार हे दोन मध्ये काम करतात मात्र आठ तास ड्युटी झाल्यानंतर त्यांना तीन शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे.
- पर्याय – क्र.१ ) सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पहिली शिफ्ट दुपारी ३ ते रात्री १० पर्यत दुसरी शिफ्ट आणि रात्री १० ते सकाळी ८ पर्यत तिसऱ्या शिफ्ट असणार आहे.
- पर्याय – क्र. २) सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पहिली शिफ्ट दुपारी ३ ते रात्री ११ वाजेपर्यंत दुसरी शिफ्ट आणि रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत तिसरी शिफ्ट
- या दोन्ही पर्याय पैकी एक पर्याय पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी निवडून ड्युटीचे वाटप करावे असे आदेशात म्हटले आहे. दरम्यान ड्युटी वाटपाबाबत काही अडचणी असल्यास पोलीस उपायुक्त (अभियान) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे पोलीस आयुक्त पांडे यांनी म्हटले आहे.