गोवंडीत लसीकरण मोहिमेत सहभागी झालेल्या इंटर्न्सना ना बसची सोय ना पाण्याची…

गोवंडीतील गोवरची बाधा कमी करण्यासाठी आता मुंबईतील प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्न्सची टीम शुक्रवारी गोवंडीत रुजू झाली. मात्र पहिल्याच दिवशी इंटर्न्सचा पालिका प्रशासनाकडून मूलभूत सुविधा न मिळाल्याने हिरमोड झाला. कोरोनाची परिस्थिती हाताळण्याचा अनुभव पालिका प्रशासनाच्या हाती असताना जेवण-पाण्याची सुविधा इंटर्न्सला न देणे अत्यंत चुकीचे असल्याचे मत इंटर्न्सनी व्यक्त केले. कित्येकांनी पहिला दिवस स्वतःजवळ असलेले बिस्कीट खाऊन काढला.

( हेही वाचा : एसटीच्या ताफ्यात पाच हजार इलेक्ट्रिक गाड्या; तिकिटदर कमी, प्रवाशांना मिळणार ‘या’ दर्जेदार सुविधा!)

गुरुवारी रात्री साडेआठवाजता आम्हांला गोवरप्रतिबंधात्मक लसीकरणात सहभागी होण्याचे निर्देश दिले गेलेत. आम्ही सकाळी अकरापर्यंत गोवंडीत पोहोचलो. गोवंडीत कूपर, नायर आणि केईएम रुग्णालयातील इंटर्न्स लसीकरण केंद्रावर पोहोचले. रफीकनगर तसेच नजीकच्या भागात घरोघरी सर्व्हेक्षणात गोवर संशयित बालकांना ओळखण्याचे नेमके तोंडी प्रशिक्षण इंटर्न्स आरोग्यसेविकांना देत होते. लसीकरणात इंटर्न्स स्वतःहून वेगवेगळ्या ठिकाणी सहभागी होत होते. मात्र इंटर्न्सना माहिती देण्यासाठी वॉर्डनिहाय अधिकारीही दिसून येत नव्हते. त्यामुळे इंटर्न्सचा पहिला दिवस गोंधळाचा ठरला.

साधे पाणी आणि जेवणाची सोयही केली नसल्याने इंटर्न्सचा हिरमोड झाला. रुग्णालय ते क्षेत्रभेटीपर्यंत आम्हांला बसची सुविधाही पुरवलेली नाही. याबाबत नंतर बोलू, असे वरिष्ठांकडून सांगितले जात आहे. याबाबत अंतिम निर्णय घेतला नाही तर संघटनेच्यावतीने पालिका प्रशासनाकडे दाद मागितली जाईल, असेही काही इंटर्न्सनी सांगितले.

लसीकरणात सहभागी झालेल्या इंटर्न्सची रुग्णालयनिहाय संख्या

  • कूपर रुग्णालय – २५
  • केईएम,सायन आणि नायर – प्रत्येकी ४०
  • एकूण लसीकरण मोहिमेत सहभागी इंटर्न्सची संख्या – १४५

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here