मलजल प्रक्रिया प्रकल्पांच्या निविदेत अनियमितता : २० हजार कोटींहून वाढणार खर्च

महापालिकेच्या अर्थसंकल्पात आता नवीन मलजल प्रक्रिया केंद्रांच्या उभारणीनंतर दरवर्षी हजारो कोटी रुपयांची तूट येणार आहे, ही तूट भरुन काढण्यासाठी सांडपाणी शुल्कात वाढ केली जाईल.

130

वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, घाटकोपर, भांडुप येथील मलजल प्रक्रिया प्रकल्प निविदेतील मुल्यांकन तसेच पडताळणी पध्दतीत अनियमितता असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे. या प्रकल्पातील अनियमितता पाहता प्रकल्प आणि देखभालीचा खर्च वीस हजार कोटींहून अधिक होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे एकूणच पाचशे ते सहाशे कोटी रुपयांची दरवर्षी शिल्लक राहणाऱ्या महापालिकेच्या अर्थसंकल्पात आता नवीन मलजल प्रक्रिया केंद्रांच्या उभारणीनंतर दरवर्षी हजारो कोटी रुपयांची तूट येणार असून ही तूट भरुन काढण्यासाठी सांडपाणी शुल्कात वाढ केली जाईल. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना दहा पट अधिक सांडपाणी शुल्क भरावे लागेल, अशीही शक्यता वर्तवली आहे.

मुंबईकरांना दहापट अधिक सांडपाणी शुल्क भरावे लागेल!

मुंबई महानगरपालिकेडून वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, घाटकोपर, भांडुपसह मालाड येथील मलजल प्रक्रिया केंद्रासाठी निविदा मागवण्यात आल्या. मालाड येथील प्रकल्पासाठी निविदाकारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. पण एसटीपी निविदेतील अनियमिततेमुळे प्रकल्पाची किंमत आणि खर्चात प्रचंड वाढ होणार आहे व काही हजारो कोटींचा अनावश्यक बोजा महापालिका तिजोरीवर पडणार आहे. त्यामुळे भविष्यात सर्वसामान्य मुंबईकरांना दहापट अधिक सांडपाणी शुल्क भरावे लागेल, असे भालचंद्र शिरसाट यांनी आयुक्तांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

(हेही वाचा : कडक लॉकडाऊन तरी सापडले साडेतीन हजार विनामास्क!)

प्रकल्पाचा खर्च गंगा प्रकल्पापेक्षा दहापट अधिक 

निविदाकाराने अपेक्षित खर्चाच्या ३० ते ६० टक्के अधिक रक्कम नमूद केली आहे. निविदाराने दर्शवलेली किंमत दीड वर्षांपूर्वी आलेल्या प्रतिसादात्मक निविदेपेक्षा ८० टक्के ते १५० टक्के अधिक आहे. यापूर्वी येणारा सांडपाणी प्रक्रिया खर्च ५ कोटी प्रति  दशलक्ष  होता. सध्या निविदेतील येणारा सांडपाणी खर्च २५० टक्के म्हणजेच प्रति दशलक्ष १२.५ कोटी रुपये येणार आहे. यासारख्याच गंगा – यमुना नदीवर असलेल्या ‘नमामि गंगा’ प्रकल्पात सांडपाणी प्रक्रिया खर्च २ कोटी रुपये प्रति दशलक्ष आहे. या निविदेतील प्रकल्प कार्यान्वित ठेवणे आणि देखभाल खर्च १२ रुपये प्रति क्युबिक मीटर म्हणजेच गंगा प्रकल्पापेक्षा जवळजवळ दहापट अधिक आहे.

प्रक्रिया करण्यात येणाऱ्या पाण्याच्या खर्चाची किंमत भिन्न

सर्व ठिकाणी सांडपाणी प्रक्रियेची पद्धत सारखीच नसते. मात्र, इनपुट आउटपुट वरून सांडपाण्यावरील प्रक्रिया ठरवली जाते. वरील सर्व तांत्रिक बाबींचा विचार निविदेत करण्यात आलेला नाही. प्रकल्पात येणारे आणि प्रक्रिया पूर्ण करून जाणारे सांडपाणी यामध्ये बीओडी, सीओडी, टीएसएस, क्लोराइड, फॉस्फरस, नाइट्रोजन, नायट्रेट तसेच पोटॅशियम पॅथॉजेन मोजणी विचारात घेतली जाते. प्रकल्पात येणारे सांडपाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून आल्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया करण्यात येणाऱ्या खर्चाची किंमत गुणवत्तेनुसार भिन्न असू शकते. जर प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा मूळ वापर बागकामासाठी करायचा असेल तर त्यात नाइट्रेटस ठेवले पाहिजेत. ते पाणी समुद्रात सोडताना समुद्र वनस्पतीसाठी उपयुक्त आहे का पाहणे गरजेचे आहे. औद्योगिक वापरासाठी असलेल्या पाण्यातील सर्व रासायनिक घटक बाजूला करणे गरजेचे आहे. त्यामुळे सब घोडे बारा टक्के हे सूत्र सर्व ठिकाणी वापरता येणार नाही. त्यासाठी स्वतंत्रपणे गुणांकन मुल्यांकन करायला हवे, याचा विचार प्रकल्प सल्लागार व महापालिकेच्या अभियंत्यांनी मुल्यांकन करताना केलेला नाही. एसटीपी सल्लागार हे निविदेच्या मूल्यांकनासाठी ४० ते ५० कोटी रू. सल्लागार शुल्क आकारतात. मात्र, या प्रकल्पांसाठी एसटीपी सल्लागार मूल्यांकन करण्यास अपयशी ठरले असताना त्यांना त्याबाबतचे शुल्क का द्यायचे, असाही सवाल त्यांनी केला. सध्या कोविडचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन सदृश्य स्थिती लक्षात घेऊन घाईघाईने ही सहा कंत्राटे देण्याचा व मोठी वसुली  म्हणजेच २००० कोटी करण्याची घाई सुरु आहे असे कळते, असेही त्यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिकेतील या अत्यंत महत्वाच्या १० वर्षे रखडलेल्या वीस हजार कोटी पेक्षा जास्त किमतीच्या निविदेला आता अत्यंत घाईघाईत पूर्ण करण्यासाठी महापालिका बाहेरील काही व्यक्ती कार्यरत आहेत व या निविदेसंबंधी बैठका महापालिकेबाहेर मेकर्स चेंबरमध्ये महापालिका वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत होतात, अशी चर्चा ऐकावयास येत आहे. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचेही म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.