इशरत काझी ठरली स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती सुवर्णपदकाची मानकरी

मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती सुवर्णपदका’ची यंदाची मानकरी इशरत काझी ही रत्नागिरीची तरुणी ठरली. सेंद्रिय रसायनशास्त्र विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती सुवर्णपदकाने तिला सन्मानित करण्यात आले.
 
मुंबई विद्यापीठाचा २०२२चा दीक्षांत समारंभ गुरुवारी, २३ फेब्रुवारी रोजी पार पडला. यावेळी राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंचाचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्रभारी प्र कुलगुरू डॉ. अजय भामरे, डॉ. सुनील भिरुड, डॉ. प्रसाद कारंडे व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 
डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते इशरत काझी हिला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. लांजा येथील न्यू एज्युकेशन सोसायटी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या इशरत हिने २०२२ मध्ये रसायनशास्त्र विषयात पद्व्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे सेंद्रिय रसायनशास्त्र विषयात राज्यात सर्वाधिक गुण मिळवण्याचा विक्रम तिने केला. या कर्तृत्त्वाबद्दल तिला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले.

पदकांमध्ये मुलींची बाजी

विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखा, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्या शाखा, मानव विज्ञान विद्या शाखा, अंतर्विद्याशास्त्रीय शाखा या अभ्यासक्रमात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या १८  विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठातर्फे सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. त्यातील मुलींची संख्या १२ इतकी आहे. स्त्रीशक्तीने बजावलेल्या या कामगिरीबद्दल डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी कौतुक केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here