भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) महत्त्वपूर्ण मानवी अवकाश मोहिमेच्या तयारीसाठीची पहिली चाचणी आज (शनिवार) यशस्वी करण्यात आली. सुरुवातीला सकाळी ८ वाजता प्रक्षेपण होणार होते, मात्र खराब हवामानामुळे प्रक्षेपणाची वेळ बदलून सकाळी ८.४५ करण्यात आली. मात्र त्यानंतर इंजिन योग्यरित्या प्रज्वलित झाले नाही. त्यानंतर इस्रोकडून तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आणि १० वाजता यशस्वी उड्डाण करण्यात आले. ‘टेस्ट व्हेईकल (टीव्ही-डी१) या एकाच टप्प्यातील इंधन रॉकेटचे प्रक्षेपण झाले.
गगनयान’ या भारताच्या मानवी अवकाश मोहिमेत अंतराळवीरांच्या सुरक्षेची खात्री ‘टीव्ही-डी१’मधील ‘क्रू मोड्यूल’द्वारे घेण्यात आली. या चाचणी उड्डाणाच्या यशामुळे उर्वरित चाचण्या आणि मानवरहित मोहिमांचा मार्ग मोकळा झाला आहे.
(हेही वाचा – RBI Governor on Crypto : आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा क्रिप्टोला विरोध कायम)
भारतीय अंतराळवीरांच्या पहिल्या गगनयान मोहिमेसाठी (Gaganyaan mission) या चाचण्या महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. गगनयान मोहीम २०२५ मध्ये प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा आहे.
‘टीव्ही-डी१’मध्ये सुधारित विकास इंजिनाचा समावेश केलेला असून त्याच्या पुढील भागात ‘क्रू मोड्यूल’ आणि ‘क्रू एस्केप सिस्टिम’ ही उपकरणे बसविण्यात आली आहेत. हे यान३४.९ मीटर उंच आहे आणि त्याचे वजन ४४ टन आहे.
भारतासाठी अतिशय परिणामकारक
यासंदर्भात इस्त्रोचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नाईक यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ ला सांगितले की, आज झालेली ‘गगनयान’ मोहिमेची चाचणी अत्यंत महत्त्वाची होती. भारतासाठी ही मोहिम अतिशय परिणामकारक आहे. चंद्रयान-३ मुळे भारताला गौरवाचं स्थान मिळालं. त्याचं धोरणातली ही चाचणी होती. ही गगनयान मोहीम अत्यंत परिणामकारक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेल्या २०३६ साली स्पेस स्टेशन आणि २०४० साली आपल्याला भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाठवायचे आहेत. याकरिता या मोहिमेचा उपयोग होणार आहे. ‘गगनयान मोहिमेत’ ४ किंवा १० मिनिटांत क्रू मॉडेल खाली उतरवलं वेग कमी करण्यासाठी आणि यशस्वीरित्या ते १० वाजता वर झेपावलं. यामुळे अगदी थोड्या वेळाकरिता त्यात नाट्यमयरित्या तांत्रिक बिघाड झाला, पण यशस्वीरित्या आजची अतिशय महत्त्वाची गगनयान मोहिम पार पडली याचा आनंद आहे.
अंतराळवीरांना अंतराळात नेणारी ISRO ही दुसरी अंतराळ संस्था
गगनयान-१ ही मोहीम संपूर्णत: स्वेदशी बनावटीशी आहे. २ ते ३ वर्षांनी आपण भारतातून ३ अंतराळवीर अंतराळात पाठवणार आहोत. अंतराळात जेव्हा आपण अंतराळवीरांना पाठवतो. तेव्हा ती जोखीम असते. अंतराळात ऑक्सिजनप्रूफ वातावरण ठेवावं लागतं. त्यामुळे यासंदर्भात एकही चूक होता कामा नये. एका छोट्या रॉकेटमधून क्रू मॉडेल आपण पाठवलं. १७ किमी. उंचीवर हे विकास इंजिन श्रीहरिकोटा येथून पाठवण्यात आलं. यासाठी इस्रोने रशियाकडून सुरुवातीचा पाठिंबा घेतला होता, पण त्यानंतर फ्रेंचकडून मिळणारा सहयोग वगळता, बाकी सर्व काही उपकरणे भारतात बनवले जाते. अंतराळात पाठवण्याकरिता भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. अंतराळवीर किंवा क्रू मेंबर म्हणून आणि कठोर प्रशिक्षण देऊन अंतराळवीरांना अंतराळात नेणारी ISRO ही दुसरी अंतराळ संस्था आहे. या मोहिमेमध्ये पहिला क्रमांक चीनचा आहे. अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पृथ्वीपासून ४०० किमी अंतरावर लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये कार्यरत आहे. हा ISS चा सहभाग आहे . यामध्ये NASA, ROSKOSMOS, CSA, ESA आणि JAXA या संस्थांच्या सहकार्यामुळे इस्रो आपल्या गगनयान मिशनद्वारे मोठी कामगिरी करणार आहे, अशी माहिती इस्त्रोच्या शास्त्रज्ञ लीना बोकिल यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला दिली.