कुर्ल्यातील एलबीएससह इतर भागातील पूर रोखण्यासाठी असाही प्रयत्न!

173
मुंबईत मिठी नदीच्या रुंदीकरणासह खोलीकरणाचे काम जवळपास ९५ टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी नदीने पुराची रेषा गाठल्यानंतर कुर्ला परिसरातील काही वस्त्या पाण्याखाली जात आहेत. त्यातच मागील दोन वर्षांमध्ये एल.बी.एस मार्गावर पाणी साचण्याचे प्रकार वाढून हा संपूर्ण रस्ताच जलमय होतो. परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने यंदा महापालिका पर्जन्य जलवाहिनी विभागाने एलबीएसवरच अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. एलबीएसवरील पर्जन्य जलवाहिनी ३० ते ४० टक्के गाळाने भरलेल्या असल्याने पाण्याचा प्रवाहही संथगतीने होत आहे. त्यामुळे  मागील अनेक वर्षांपासून न झालेल्या एलबीएसवरील या बंदिस्त कल्व्हर्टची साफसफाई करून संपूर्ण पर्जन्यजलवाहिनी साफ करण्याचा  निर्णय घेतला आहे.

म्हणून पूरपरिस्थिती निर्माण होते

कुर्ला एलबीएस मार्गावरील पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या या मिठी नदीच्या पातमुखांना जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मिठी नदीला पूर आल्यास इतर भागासह एलबीएस मार्गावरही पाणी साचते. कुर्ला एल विभागातील पर्जन्य जलवाहिन्यांमधील दोन मनुष्य प्रवेशिकांमधील (मॅनहोल्स) अंतर खूप जास्त आहे. त्यामुळे रोड कल्व्हर्टची खोलवर साफसफाई करण्यास अडथळा निर्माण होतो. या पर्जन्यजलवाहिन्यांच्या क्षमतेनुसार पावसाचा पाण्याचा निचरा त्वरीत होत नसल्याने एल विभागातील बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होते.
panyachi mumbai4

मान्यतेनंतर कामाला सुरुवात

सर्वसाधारणपणे एकूण ३ हजार ८८५ मीटर लांबीची विविध आकाराची पावसाळी पाणी वाहून नेणारी पेटीका वाहिनी असून या पर्जन्य जलवाहिनीमुळेच एलबीएस शेजारी असलेल्या झोपडपट्टयांचा परिसर जलमय होतो. मिठी नदीमुळे होणाऱ्या पूरजन्य परिस्थितीलाही  ही पर्जन्य जलवाहिनी कारणीभूत ठरत असल्याचे पाहणीमध्ये आढळून आले आहे. या बंदिस्त पेटारी पर्जन्य जलवाहिनी त्यांच्या आकाराच्या ३० ते ४० टक्के गाळाने भरलेल्या आहेत. त्यामुळे जरी त्या कार्यरत असल्या तरी ३० ते ४० टक्के कमी क्षमतेनेच पावसाळी पाण्याचा निचरा केला जातो. त्यामुळे  एलबीएससह इतर पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या बंदिस्त पेटीका वाहिनी या शहरातील पर्जन्य जलवाहिनी साफ करण्याच्या धर्तीवर स्वच्छ करण्याची मागणी तत्कालिन एल विभागाचे सहायक आयुक्त मनिष वळंजू यांनी पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या लक्षात आणून दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तत्कालीन नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी पर्जन्य जलवहिनी विभागाशी याचा पाठपुरावा करत या कल्व्हर्टच्या सफाईचे काम हाती घेण्यास भाग पाडले. मागील वर्षभर याचा पाठपुरावा केल्यानंतर याची निविदा प्रक्रिया पूर्ण करत कंत्राटदारांची निवड करण्यात आली असून, समितीच्या मान्यतेनंतर या कामाला सुरुवात झाली आहे.
panyachi mumbai3

( हेही वाचा विनामास्क लोकांकडून घेतलेला दंड बेकायदेशीर? )

म्हणून यांत्रिकी पद्धतीचा वापर
त्यानुसार कुर्ल्यातील अशाप्रकारे ३ हजार ८८५ मीटर लांबीच्या पर्जन्य जलवाहिनीतील गाळ काढण्यासाठी सुमारे ४ कोटी ६ हजार रुपये खर्च केले जाणार आहे. यासाठी एकॉर्ड वाटरटेक एण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. जमिनीखाली पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये असलेल्या धारांमुळे विषारी वायू आणि तेथे खेळती हवा नसल्याने मनुष्यबळाचा वापर करून न घेता यांत्रिकी पध्दतीने केले जात असल्याची माहिती पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
panyachi mumbai2
panyachi mumbai
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.