स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, १३ जुलै २०२२ रोजी आषाढ गुरुपौर्णिमेच्या दिवशी मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाचा आरंभ दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात करण्यात आला, तसेच मोडी लिपी स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ देखील यावेळी संपन्न झाला. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर आणि श्री.शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराजचे अध्यक्ष सुनील पवार यांनी विशेष भाषण केले.
आपला इतिहास हा पराभूतांचा नाही, तसा असता तर आपण आज जिवंत नसतो. मात्र आमच्या दहा चुका लपवण्यासाठी खरा इतिहास सांगायचा नाही, अशी परंपरा आपल्याकडे आली. आपल्याकडे शिवाजी महाराजांचाही इतिहास पूर्णपणे नाही. असे उद्गार यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी काढले.
(हेही वाचाः स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात मोडी लिपी प्रशिक्षण वर्गाची सुरुवात)
मोडी लिपीतील इतिहास समजणे आवश्यक- रणजित सावरकर
आपण आपला इतिहास दाबून टाकला आहे. बखरी म्हणजे काही मराठ्यांचा इतिहास नाही, मोडीमध्ये कोट्यवधी कागदपत्रे आहेत. विविध प्रकारचे पत्रव्यवहार आहेत, तो इतिहास म्हणूनही गोळा केला तो देखील ४-५ लाख कागदांवर नाही. अजूनही तो बराच आहे, असे सांगत मोडीचे महत्त्व रणजित सावरकर यांनी सांगितले. मोडीतील कागदपत्र वाचन इतिहास कळण्यासाठी झाले पाहिजे, असेही यावेळी ते म्हणाले.
मोडी लिपीचा शालेय अभ्यासक्रमात अंतर्भाव करावा- सुनील पवार
श्री.शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराजचे अध्यक्ष सुनील पवार यांनी मोडी लिपीचे महत्त्व सांगताना आता नव्या सरकारकडे आपण शालेय अभ्यासक्रमात पुन्हा मोडी लिपीचा अंतर्भाव करावा, अशी मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले. त्या संबंधात त्यांनी काही महत्त्वाची कारणमीमांसाही यावेळी केली.
Join Our WhatsApp Community