मुंबईतील रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतर आणि शाळेपासून १०० मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांवर महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई केली जाणार असल्याची घोषणा पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी केल्यानंतर अद्यापही महापालिकेला पोलिसांचे सहकार्य मिळत नसल्याच्या कुरबुरी ऐकायला येवू लागल्या. आजवर अनेकदा अशाप्रकारचे निर्देश देण्यात आले, परंतु पोलिसांकडूनच सहकार्य होत नसल्याने महापालिकेच्या माध्यमातून कारवाई केल्यानंतरही पुन्हा त्याठिकाणी फेरीवाले बसत आहे. त्यामुळे एकदा कारवाई झाल्यानंतर त्याठिकाणी पुन्हा फेरीवाले बसू नये याची काळजी पोलिसांनी घेतल्यास मुंबईतील रेल्वे स्थानकांसह महत्वाचे रस्ते फेरीवाले मुक्त बनवण्यात यश येईल असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.
ना महापालिकेची भीती, ना पोलिसांची
मुंबईतील फेरीवाल्यांच्या कारवाईसंदर्भात पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी मंगळवारी पोलिस मुख्यालयात बैठक घेऊन कारवाईचे निर्देश दिले होते. या बैठकीला पोलिस अधिकारी तसेच महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पुढील एक महिन्यांनी पुन्हा आढावा बैठक घेतली जाईल,असेही त्यांनी सांगितले. परंतु दादरमध्ये आजवर केवळ सहापर्यंत चांगल्याप्रकारे कारवाई केली जात असून सहानंतर पुन्हा एकदा फेरीवाले आपापल्या जागांवर बसून व्यावसाय करत असतात. रेल्वे स्थानकापासून १५० मीटरच्या अंतरापर्यंत फेरीचा व्यावसाय करण्यास बंदी असून न्यायालयाच्या निर्देशानंतरही फेरीवाल्यांवर कडक कारवाई केली जात नाही. उलट रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यावर बसून व्यावसाय केला जात आहे. दादर रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वारालाच फेरीवाल्यांनी विळखा घातलेला आहे. परंतु या फेरीवाल्यांना ना महापालिकेची भीती, ना पोलिसांची भीती. त्यामुळे मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या परिसरात फेरीवाले मोठ्या संख्येने रस्ता तसेच पदपथ अडवून बसल्याचे पहायला मिळत आहे.
( हेही वाचा :खेळताना रंग बाई होळीचा होळीचा… )
पोलिसांचे सहकार्य मिळेल असा विश्वास
पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी दिलेल्या निर्देशानंतर बुधवारी दादर रेल्वे स्थानक परिसरात कडक कारवाई झाली. त्यानंतर गुरुवारीही कारवाई करण्यात आली. परंतु सहा वाजता फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करणारी वाहने निघून गेल्यानंतर पुन्हा फेरीवाल्यांनी पथारी पसरुन व्यावसाय करण्यास सुरवात केली. महापालिकेने कारवाई केल्यानंतर पुढे पोलिसांकडून त्यावर कारवाई केली न गेल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांची पाठ फिरताच फेरीवाल्यांनी जागा अडवण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिस आयुक्तांच्या निर्देशानंतरही पोलिसांकडून आवश्यक ते सहकार्य मिळत नसल्याची कुजबूज ऐकायला मिळत आहे. रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई केल्यांनतर त्याठिकाणी पुन्हा फेरीवाले बसणार नाही याची काळजी पोलिसांकडून घेतली जाणे अपेक्षित आहे, परंतु अशाप्रकारची काळजी पोलिस घेत नाही. परिणामी हे सहकार्य मिळत नसल्याने महापालिकेने कारवाई केल्यानंतर अधिकाऱ्यांची पाठ फिरताच पुन्हा त्याठिकाणी फेरीवाले बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दादरसह मालाड, बोरीवली, कांदिवली, गोरेगाव,अंधेरी, जोगेश्वरी, कुर्ला, चेंबूर,मुलुंड,भांडुप, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,मस्जिद बंदर,घाटकोपर आदी भागांमध्ये मोठ्याप्रमाणात रेल्वे स्थानकांच्या परिसरांमध्ये फेरीवाल्यांनी ठाण मांडले असून यावर महापालिकेची कारवाई निष्क्रिय ठरलेली पाहायला मिळत आहे. मात्र,आता पोलिस आयुक्तांच्या निर्देशानंतर पोलिसांचे सहकार्य मिळेल असा विश्वास महापालिकेचा अधिकाऱ्यांना वाटत असला तरी त्यातील सातत्य किती राहिल याबाबतही ते साशंक असल्याचे दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community