शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) (ITI Trainees Tuition Payments) शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत मान्यता असलेल्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनात प्रति महिना ५०० रुपये वाढ केली आहे. यासंदर्भात राज्य शासनातर्फे अध्यादेश जारी करण्यात आला आहे. तब्बल ४० वर्षांनंतर ही वाढ करण्यात आली आहे.
आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांना १९८३ पासून विद्यावेतन देण्यात येते. प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांपैकी ५० टक्के पात्र प्रशिक्षणार्थ्यांना विभागनिहाय ४० ते ६० रुपये विद्यावेतन दिले जात होते. त्यामध्ये ४० वर्षांपासून कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही, मात्र वाढत्या महागाईमुळे एवढ्या अत्यल्प रकमेत खर्च भागवणे शक्य नसल्याने प्रशिक्षार्थी सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गातील असल्याने विद्यावेतनाच्या दरामध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.
८० टक्के उपस्थिती अनिवार्य
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती आणि भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक समाजातील आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील प्रशिक्षणार्थी विद्यावेतनासाठी पात्र आहेत. विद्यार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असणे तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, अशा सर्व प्रशिक्षणार्थींना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून दरमहा ५०० रुपये विद्यावेतन देण्यात येईल. तीन महिन्यांच्या हप्त्यांत हे विद्यावेतन देण्यात येणार असून याकरिता ८० टक्के उपस्थिती अनिवार्य आहे तसेच दोन वर्षांच्या अभ्यासक्रमातील दुसऱ्या वर्षातील विद्यावेतनाचा लाभ मिळवण्यासाठी प्रशिक्षणार्थी पहिल्या वर्षी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.