सेवानिवृत्तीनंतरही जे जे इस्पितळात आणि राज्यभर मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी धडपडणारे नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह नेत्र विभागातील आठ डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. सोबतच नेत्र विभागाच्या प्रमुख डॉ. रागिणी पारेख यांनी देखील स्वेच्छा निवृत्तीची इच्छा प्रकट केली आहे. मागील वर्षभरापासून इस्पितळाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडून होत असलेल्या असहकाराच्या भूमिकेमुळे हे सर्व डॉक्टर राजीनामा देत असल्याचे बोलले जात आहे.
नक्की का दिले जात आहेत राजीनामे?
नेत्रविभागातील प्रथम व द्वितीय वर्षाच्या निवासी डॉक्टरांनी केलेल्या तक्रारीनंतर एक समिती बनवण्यात आली, ज्याचे प्रमुख डॉ. अशोक आनंद यांना बनवण्यात आले. त्यांनी इस्पितळातील चार ते पाच डॉक्टरांच्या विरोधात आधीपासूनच एट्रोसिटीच्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत आणि त्याच व्यक्तीला चौकशी समितीचे प्रमुख बनवून अधिष्ठाता पक्षपातीपणा करत आहेत. अधिष्ठाता यांनी मागील वर्षभरात या विभागाला कोणतीही मदत केलेली नाही. वारंवार अध्यापकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. तरीही या विभागातील अध्यापक अपमान सहन करुन रुग्णांच्या सेवेसाठी काम करीत आहेत. पुन्हा आता कसलीही चूक नसतांना विभागातील अध्यापकांची बदनामी करण्यात येत आहे.
(हेही वाचा New Parliament Inauguration : नवीन संसद भवनाचे उद्घाटन मोदी सरकारसाठी गेम चेंजर)
डॉ. लहाने हे मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र कार्यक्रमाचे काम करीत आहेत. सेवानिवृत्तीनंतरही डॉ. लहाने व सर्व अध्यापक रात्रंदिवस रुग्णसेवा देत आहेत. असे असले तरी त्यांचे वेतन अद्यापही अधिष्ठाता यांनी अदा केलेले नाही. त्यांना शासकीय निवासस्थानासाठी सात लाख रुपये दंड लावून ते रिक्त करण्यास सांगितले. तरीही रुग्णांशी असलेल्या बांधिलकीमुळे ते काम करीत आहेत, असे डॉक्टर लहाने यांनी सांगितले. राजीनामा देणाऱ्या डॉक्टरांनी प्रसिध्दीपत्राद्वारे तक्रारीची मुद्देसूद उत्तरे डॉक्टरांनी दिली.
यापुढेही रुग्णसेवा सुरळीत सुरु रहाण्यासाठी खालील मागण्या केल्या
- गेल्या वर्षभरापासून त्रास देणा-या अधिष्ठाता यांचेविरुध्द योग्य ती कारवाई करण्यात यावी.
- इतर निवासी डॉक्टरांना भडकावणा-या डॉ. सार्बिक डे, डॉ. संस्कृती प्रसाद व डॉ. स्मृती पांडे या तीन्ही निवासी डॉक्टरांचे पी जी रजिस्ट्रेशन रदद करावे. ईतर निवासी डॉक्टरांना बेशीस्त वर्तन केल्या बददल कडक समज द्यावी.
- डॉ. रागीणी पारेख यांनी गेल्या २८ वर्षात रात्रदिवस काम केले आहे. त्यांची स्वेच्छानिवृत्ती मंजूर करावी.
- त्याच प्रमाणे सर्व अध्यापकांचे राजीनामे मंजूर करुन त्यांना कार्यमुक्त करण्यात यावे.
अखेर हे सर्व का घडले? कोणी केली होती तक्रार?
जे.जे. हॉस्पिटलमधील ऑप्थलमोलॉजी विभागाच्या कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी डॉ. तात्याराव लहाने यांचे पुत्र डॉ. सुमीत लहाने यांच्याविरुद्ध तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी हॉस्पिटलच्या अधिष्ठात्यांकडे केली होती. सुमीत लहाने यांनी आपल्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी ज्युनियर डॉक्टरांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला होता.
डीएमईआरचे निवृत्त संचालक आणि माजी अधिष्ठाते डॉ. तात्याराव लहाने हे अद्यापही विभागात मोतिबिंदू शस्त्रक्रिया करत असल्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रमावर त्याचा प्रतिकूल परिणाम घडत आहे. हे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारे आहे, अशी तक्रार जे.जे.मधील कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी केली आहे. यावर जे.जे. हॉस्पिटलच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी तीनसदस्यीय समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत.
Join Our WhatsApp Community