जाफर चिकनाला न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा!

मुंबई शहरासह आजूबाजूच्या शहरात सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचे अर्धशतक ठोकणारा जाफर चिकना हा स्वत:च एक टोळी चालवत होता.

118

मुंबईत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी एका झटक्यात खेचून पोबारा करणारा जाफर चिकना याला ४ वर्षांपूर्वी त्याच्या दोन सहकाऱ्यांसह अटक करण्यात आली होती. या तिघांच्या अटकेनंतर मुंबईतील सोनसाखळीच्या गुन्ह्यात कमालीची घट झाली होती. त्याच जाफर चिकना आणि त्याच्या सहकाऱ्यांना मोक्का अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०१७ मध्ये चिकना आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती, तिघांवर मोक्का अंतर्गत केलेल्या कारवाई नंतर ४ वर्षांनी विशेष मोक्का न्यायालयाने त्याला ७ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

चिकना हा स्वत:च टोळी चालवत होता!

जाफर देशमुख उर्फ जाफर चिकना हे नाव सोनसाखळी चोर टोळ्यांमध्ये मोठ्या अदबीने घेतले जाते. सोनसाखळी टोळ्यांमध्ये जाफर चिकनाला आदर्श मानले जायचे. त्याचा हा आदर्श घेऊन शहरात अनेक सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळ्या तयार झाल्या. मुंबई शहरासह आजूबाजूच्या शहरात सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचे अर्धशतक ठोकणारा जाफर चिकना हा स्वत:च एक टोळी चालवत होता. टोळ्यातील सदस्यांना चोरीचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या मार्फत शहरात सोनसाखळीचे गुन्हे करीत होता. हेच सदस्य पुढे स्वतःची टोळी तयार करून मुंबईसह परिसरातील शहरात धुमाकूळ घालत होती.

(हेही वाचा : यंदा बाप्पांची संख्या २० हजाराने वाढली!)

तिघांना ७ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा, ५ लाख रुपयांचा दंड सुनावला!

मुंबईतील परिसरातील वडाळा येथे राहणारा जाफर उर्फ चिकना जाफर मोहंमद खान याला माहीम परिसरातून सायन पोलिस ठाण्याचे तत्कालीन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी मोहन जगदाळे यांच्या पथकाने जुलै २०१७ मध्ये जाफर चिकनाचे सहकारी धीरज जोगिंदर कनोजिया आणि विजय कृष्णा काळे उर्फ सद्दाम यांना अटक केली होती. जाफर चिकना याच्यावर मुंबई, ठाणे जिल्ह्यात ५० पेक्षा अधिक सोनसाखळी चोरी, जबरी चोरी सारखे गुन्हे दाखल असून विजय काळे उर्फ सद्दाम याच्यावर सुमारे ६० गुन्हे तर धीरज कनोजिया याच्यावर २१ गुन्हे दाखल आहेत. परिमंडळ ४ च्या तत्कालीन पोलीस उपायुक्त एन. अंबिका सपोआ. अजिनाथ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. मोहन जगदाळे यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. हे तिघे २०१७ पासून तुरुंगात असून त्याच्यावर विशेष मोक्का सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल शुक्रवारी लागला आहे. मोक्का न्यायालयाने या तिघांना ७ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा आणि ५ लाख रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.