रावेर तालुक्यातील सुकी नदी पात्रात सोमवारी सायंकाळी अडकलेल्या नऊ पर्यटकांना चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात प्रशासनास यश आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सुखी (गारबर्डी) धरणाचा वेस्ट वेअर ओसंडून वाहत असून, या जलप्रवाहाच्या विळख्यात ९ पर्यटक अडकल्याची माहिती सायंकाळी 6.30 वाजता स्थानिकांनी प्रशासनाला दिली. हे नऊ पर्यटक नदीच्या मधोमध उभे असून, पाण्याचा वेढा त्यांच्या दोन्ही बाजूने पडला आहे. तसेच पाण्याचा प्रवाह वाढतच असल्याने हे सर्वजण वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात होती. याबाबतची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बेहरे, सावदा येथील उपविभागीय अभियंता यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला देऊन बचावकार्य तातडीने उपलब्ध करून देण्याची विनंती केली. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना मिळताच त्यांनी फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग आणि रावेरच्या तहसिलदार उषाराणी देवगुणे यांना बचाव साहित्यासह घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर सतत सुरू असलेला पाऊस तसेच नदीपात्रात वाढत जाणारे पाणी ही बाब लक्षात घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मदत मिळण्यासाठी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षास संपर्क साधण्यात आला. त्यानुसार धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडीही घटनास्थळाकडे रवाना झाली.
( हेही वाचा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल, म्हणाले “14 खासदारच नव्हे तर”…)
सुकी नदी पात्रात अडकलेल्या व सुटका झालेल्या व्यक्ती
- अतुल प्रकाश कोळी (२०)
- विष्णू दिलीप कोलते (१७)
- आकाश रमेश धांडे (२५)
- जितेंद्र शत्रुघ्न कूंडक (३०)
- मुकेश श्रीराम धांडे (१९)
- मनोज रमेश सोनावणे (२८)
- लखन प्रकाश सोनावणे (२५)
- पियूष मिलिंद भालेराव (२२)
- गणेशसिंग पोपट मोरे (२८)
या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी दिली आहेत. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून, नदीपात्रात पाण्याची अचानक वाढ होत असल्याने, नागरिकांनी नदीपात्रात तसेच धरण परिसरात जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.