Maratha Reservation : जालन्यात ४ ते १७ सप्टेंबरपर्यंत जमावबंदी

133

जालना जिल्ह्यात सोमवारी, ४ सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 17 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश देण्यात आला आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी यासंबंधीचे आदेश दिले आहेत. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर या ठिकाणची परिस्थिती बिघडली असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

‘या’ गोष्टीवर होणार बंदी

जमावबंदीच्या आदेशामुळे जालन्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) निमित्ताने विविध संघटनाकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, रास्ता रोको आणि राजकीयदृष्ट्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होत असलेले आरोप प्रत्यारोप लक्षात घेता कलम (37)1 अन्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, लाठ्या, बंदूक, तलवारी, भाले, चाकू आणि शरीरास इजा अथवा अपाय करणाऱ्या वस्तू बाळगता येणार नाहीत. तसेच दगड एकत्रित गोळा करून ठेवता येणार नाही, जवळ बाळगता येणार नाहीत. व्यक्ती किंवा त्याच्या प्रतिकात्मक शवाचे प्रदर्शन करता येणार नाही. भाषणातून व्यक्तीच्या किंवा समूहाच्या भावना दुखावता येणार नाहीत, गाणे किंवा वाद्याच्या माध्यमातून कोणाच्या भावना दुखवता येणार नाहीत. आवेशपूर्ण भाषण, अंगविक्षेप अराजक माजेल अशी चित्रे, निशाणे, घोषणापत्रे वस्तू बाळगता येणार नाहीत. जालन्यात लागू केलेल्या जमावबंदीच्या आदेशामुळे 6 तारखेची श्रीकृष्ण जयंती, 7 तारखेचा गोपाळकाला आणि 14 तारखेच्या पोळा तसेच 17 सप्टेंबरच्या दिवशी मुक्तीसंग्राम दिनानिमित्त निघणाऱ्या मिरवणुका आणि इतर कार्यक्रम रद्द करावे लागणार आहेत.

(हेही वाचा Maharashtra Kesari : धाराशिवमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरी थरार )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.