जापनीस बँकेच्या व्हाईस प्रेसिडेंटची आत्महत्या! हे आहे कारण…

116
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी असणाऱ्या एका जापनीस बँकेच्या ४२ वर्षीय व्हाईस प्रेसिडेंट याने परळ येथील राहत्या इमारतीच्या २७ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली असून मानसिक तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सुरक्षा रक्षकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली

श्लोक शशिकांत कपूर (४२) असे आत्महत्या करणाऱ्या जापनीस बँकेच्या व्हाईस प्रेसिडेंटचे नाव आहे. श्लोक हे आपल्या कुटूंबासह परळ येथील डॉक्टर एस.एस.राव मार्गावरील अशोका टॉवर्सच्या १६व्या मजल्यावर राहण्यास होते. शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास इमारतीवरून काही तरी पडण्याचा आवाज झाल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता श्लोक हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. सुरक्षा रक्षकांनी ही माहिती इमारतीच्या व्यवस्थापक आणि श्लोक यांच्या कुटुंबियांना दिली.

खाजगी डॉक्टरकडे उपचार देखील सुरू होते

श्लोक यांना तातडीने उपचारासाठी केईएम रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन त्यानंतर घटनास्थळाची पहाणी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्लोक हे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एका जापनीस बँकेचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट होते. मागील काही वर्षांपासून ते मानसिक तणावात होते व त्यांच्यावर खाजगी डॉक्टरकडे उपचार देखील सुरू होते. शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते घरातून बाहेर पडले व थेट २७व्या मजल्यावर असलेल्या रेफुजी परिसरात गेले आणि त्यांनी तेथून खाली उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना त्याच्या घरात एक डायरी मिळून आली असून त्यात त्यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवलेली असून त्यात मानसिक तणावातून हे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.