गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाने मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि महाराष्ट्राला झोडपले. यानंतर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शाहीन चक्रीवादळाने ओमान देशाला जबरदस्त तडाखा दिला आहे. आता पुन्हा एकदा अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. याचा फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
16 ते 17 ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यातील जिल्ह्यांना फटका
सध्या केरळ किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. त्यामुळे पुढील पाच ते सहा दिवसांत या हवेच्या कमी दाब्याच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाची दिशा पूर्वेकडे असून हे बंगालच्या उपसागराकडे सरकणार आहे. याचा परिणाम म्हणून पुढील आठवड्यात 16 ते 17 ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना याचा जोरदार फटका बसणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुसळधार पावसाची शक्यता
या चक्रीवादळाचे नामकरण ‘जवाद’ असे करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. शनिवारी पुण्यासह घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर-दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि घाट परिसरातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community